तीन बंदुकांसह ३७ जिवंत काडतुसे कोल्हापुरात जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

कोल्हापूर - शिकारीसाठी वापरण्यात येत असलेल्या तीन विनापरवाना बंदुकांसह ३७ जिवंत काडतुसे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केली. याप्रकरणी चौघा संशयितांना अटक केली असून बेकायदा शस्त्रांचे बेळगाव ते आजरा कनेक्‍शन यातून पुढे आल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

कोल्हापूर - शिकारीसाठी वापरण्यात येत असलेल्या तीन विनापरवाना बंदुकांसह ३७ जिवंत काडतुसे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केली. याप्रकरणी चौघा संशयितांना अटक केली असून बेकायदा शस्त्रांचे बेळगाव ते आजरा कनेक्‍शन यातून पुढे आल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

रवींद्र यल्लाप्पा नाईक (वय ४२, रा. हारूर पैकी धनगरवाडा, आजरा), फारूक महमंद पटेल (३१, रा. आजरा), बाळू खाचू सुतार (४८, रा. सुळगा, जि. बेळगाव) आणि नीलेश लक्ष्मण परब (४१, रा. तेरसे, बांबारडे, आजरा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बेकायदा हत्यारे बाळगणाऱ्यांवर कारवाईची मोहीम स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने हाती घेतली आहे. आजरा येथील हारूरपैकी धनगरवाडा येथे एक जण प्राण्यांची शिकार करण्यासाठी बेकायदा गावठी बंदूक व काडतुसे घेऊन आले आहेत, त्या बंदुकींचा वापर लोकांना धमकविण्यासाठी करतो, अशी माहिती पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तेथे पोलिसांचे पथक पाठवले.

पोलिसांनी संशयित रवींद्र नाईकच्या घरावर छापा टाकला. त्यात त्यांना एक गावठी बारा बोअरची बंदूक चार जिवंत तर एक रिकामे काडतूस असा १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल सापडला. याबाबत नाईककडे चौकशी केली. त्यात त्याने ती आजऱ्यातील संशयित फारूक पटेलकडून घेतल्याचे सांगितले. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा लावला. 

आजरा येथील लाकूरवाडी फाट्यावर संशयित पटेल मोटारसायकवरून शिकारीला जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याच्या सॅगमधून बारा बोअरची बंदूक १० काडतुसासह मोटारसायकल मिळून आली. त्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली. त्यात आणखी १६ बोअरची दोन नळ्याची बंदूक व २२ जिवंत काडतुसे जप्त केली.

या दोघांकडून पोलिसांनी एकूण तीन बंदुका, ३७ काडतुसांसह मोटारसायकल, असा ४९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या शस्त्राबाबत त्या दोघांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी ही शस्त्रे बेळगाव येथील बाळू सुतार व आजरा येथील नीलेश परब या दोघांनी दिल्याची कबुली दिली. त्यानुसार या चौघांना पोलिसांनी अटक केल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. या वेळी अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, गृह पोलिस उपअधीक्षक सतीश माने, शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे उपस्थित होते. 

फोल्डिंगची बंदूक...
संशयित फारूक पटेल हा मोटारसायकलवरून शिकारीला जात होता. त्याच्या पाठीवर सॅग होती. त्यात त्याने १२ बोअरची बंदूक फोल्ड करून ठेवल्याचे उघड झाले. अशाच पद्धतीने बेकायदा शिकारीसाठी बंदुकीचा वापर यापूर्वी केला गेला आहे का? याची चौकशी सुरू असल्याचे अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले. 

कारवाईचे शिलेदार...
पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, उपनिरीक्षक दादाराजे पवार, कर्मचारी नरसिंग कांबळे, अमोल कोळेकर, पांडुरंग पाटील, प्रल्हाद देसाई, जितेंद्र भोसले, तुकाराम राजिगरे यांनी या प्रकरणाचा छडा लावला.

Web Title: 37 live cartridges including three guns seized in Kolhapur