
Karnataka Election : बेळगाव जिल्ह्यात ३७ टक्के मतदान! सकाळी गर्दी, दुपारी संथ प्रतिसाद
बेळगाव : जिल्ह्यात आज (ता.१०) दुपारी दीड वाजेपर्यंत सरासरी ३७ टक्के मतदान झाले. सकाळी दहा वाजेपर्यंत मतदारांनी रांगा लावून मतदानात भाग घेतला. मात्र दुपारनंतर उष्मा वाढल्यामुळे अनेक भागात मतदान केंद्रात संथगतीने मतदान प्रक्रिया पार पडली.
विधानसभा निवडणुकीनिमित्त जिल्ह्यात १८ मतदारसंघामध्ये सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरु झाले. यावेळी संथ प्रतिसाद मिळाला. मात्र, त्यानंतर सकाळी ८ ते ९ वाजल्यानंतर वेग वाढला. दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत गर्दी कायम होती. परंतु, त्यानंतर मतदानाची गर्दी कमी झाली. जिल्ह्यात दुपारी दोन वाजेपर्यंत २७ टक्के मतदानाची नोंद आहे.
सकाळी ९ वाजेपर्यंत ४.५७ टक्के मतदानाची नोंद झाली. ११ वाजता १७.९६ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागातर्फे देण्यात आली आहे. तर दुपारी दीड वाजेपर्यंत ३७ टक्के मतदान करण्यात आल्याची नोंद आहे. दुपारी दोनपर्यंत सर्वाधिक ४५ टक्के मतदान कुडची संघात झाले आहे.
त्यानंतर कागवाडला ४३ टक्के मतदानाची नोंद आहे. अथणीत ४१ टक्के चुरशीने मतदान झाल्याची नोंद आहे. चिक्कोडी ४२, निपाणी, ३८, रायबाग ३२, हुक्केरी ३९, अरभावी ३७, गोकाक ३९, यमकनमर्डी ४०, बेळगाव ३२, बेळगाव दक्षिण ३३, बेळगाव ग्रामीण ३५, खानापूर ३६, कित्तूर ३८, बैलहोंगल संघात ३७ आणि सौदत्तीमध्ये ३६ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.
दरम्यान, उमेदवार आणि लोकप्रतिनिधींनी आज सकाळी पहिल्या टप्प्यामध्ये मतदान बजाविले. उमेदवारांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले. काही उमेदवारांनी पत्नीसह मतदानाचा हक्क बजाविला. तर काहींनी वैयक्तीक मतदान केले. गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाच्या सरी पडत आहेत. शिवाय ढगाळ वातावरण आहे. पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यासाठी दुपारनंतर मतदान करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये लगबग सुरु होती.