Belgaum : ई-लिलाव मूळ रकमेत ४ कोटीची कपात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Belgaum Municipal Election
ई-लिलाव मूळ रकमेत ४ कोटीची कपात

ई-लिलाव मूळ रकमेत ४ कोटीची कपात

बेळगाव : शहरातील ३९ बस थांब्यांवरील बॅक ड्रॉप्स व डिजिटल बोर्ड्सवरील जाहीरात कर वसुलीच्या ठेक्याची मूळ रक्कम तब्बल ३ कोटी ९९ लाख रुपयांनी कमी करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील कोल्हापूर सर्कल, अशोक सर्कल, गोवावेस, गोगटे सर्कल येथील एलईडी स्क्रीनवरील जाहीरात कर वसुलीच्या ठेक्याची रक्कम ९६ लाखांनी कमी केली आहे. यासाठी महसूल विभागाने ई-लिलाव प्रक्रियेचे आयोजन केले आहे. २४ नोव्हेंबर रोजी लिलाव होणार आहे. ठेक्याची मूळ रक्कम कमी का केली? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. महापालिकेच्या मालकीच्या जागेतील ४८ व खासगी जागेतील १३२ होर्डींग्जवरील जाहीरात कर वसुलीच्या ठेक्यासाठीही २४ रोजीच लिलाव होणार आहे. पण या ठेक्याची रक्कम मात्र बदलण्यात आलेली नाही हे विशेष.

शहरातील ३९ बस थांब्यांवरील बॅक ड्रॉप्स व डिजिटल बोर्ड्सवरीस जाहीरात कर वसुलीच्या ठेक्यासाठी याआधी २२ ऑक्टोबर रोजी ई-लिलाव आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बॅक ड्रॉप्स व डिजिटल बोर्ड्ससाठी ठेक्याची मूळ रक्कम वेगवेगळी निश्‍चित करण्यात आली होती. बॅक ड्रॉप्ससाठी २ कोटी ३४ लाख निश्‍चित केले होते. या लिलाव प्रक्रियेत सहभागी होणाऱ्यांना ३ लाख ५१ हजार अनामत रक्कम भरण्यास सांगण्यात आले होते. डिजिटल बोर्ड्ससाठी २ कोटी ४ लाख निश्‍चित केले होते. तर अनामत रक्कम ३ लाख ६ हजार होती. २४ रोजीच्या लिलाव प्रक्रियेसाठी बॅक ड्रॉप्स व डिजिटल बोर्ड्ससाठी मिळून ठेक्याची मूळ रक्कम केवळ ३९ लाख रूपये निश्‍चित करण्यात आली आहे. म्हणजेच ३ कोटी ९९ लाख रूपयांनी ही रक्कम कमी झाली आहे. शिवाय अनामत रक्कम केवळ ८० हजार रूपये करण्यात आली आहे. त्यामुळेच यामागचे गौडबंगाल काय? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

मूळ रकमेत कपात

प्रमुख चौकातील एलईडी स्क्रीनवरील जाहीरात कर वसुलीचा ठेक्‍यासाठी २२ ऑक्टोबर रोजीची लिलावाची मूळ रक्कम १ कोटी ४४ लाख रूपये होती. त्या लिलाव प्रक्रियेसाठी अनामत रक्कम २ लाख १६ हजार इतकी होती. आता २४ नोव्हेंबर रोजीच्या लिलाव प्रक्रियेसाठी मूळ रक्कम केवळ ४८ लाख रूपये करण्यात आली आहे. शिवाय अनामत रक्कम १ लाख करण्यात आली आहे.

loading image
go to top