मित्राने केला दगाफटका, रूमवर बोलावून...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

प्रिंटर घेण्यासाठी सोलापुरात आलेल्या दुधनी (ता. अक्कलकोट) येथील इब्राहीम इस्माईल मनियार (वय 23) या फोटोग्राफरला मित्राने रूमवर बोलावून लुटले. ही घटना मंगळवारी (ता. 9) रात्री दहाच्या दरम्यान सेटलमेंट परिसरात घडली. या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली आहे. 

सोलापूर : प्रिंटर घेण्यासाठी सोलापुरात आलेल्या दुधनी (ता. अक्कलकोट) येथील इब्राहीम इस्माईल मनियार (वय 23) या फोटोग्राफरला मित्राने रूमवर बोलावून लुटले. ही घटना मंगळवारी (ता. 9) रात्री दहाच्या दरम्यान सेटलमेंट परिसरात घडली. या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली आहे. 

मल्लिनाथ बसण्णा आळंद, अंबादास विलास जाधव, विक्रम, श्रीकृष्ण जाधव अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. इब्राहीम हा फोटोग्राफर असून मल्लिनाथ याचा मित्र आहे. फोटोसाठीचे प्रिंटर घ्यायचे असल्याने इब्राहीम गावाकडून सोलापुरात आला. त्याने प्रिंटरसाठी 20 हजार सोबत आणले होते. सोलापुरात आल्यानंतर त्याने गावातील मित्र मल्लिनाथ यास संपर्क साधला. मल्लिनाथ याने गोड बोलून लिमयेवाडी येथील रूमवर बोलावून घेतले.

प्रिंटर घेण्यासाठी नंतर जाऊ असे म्हणून त्याला थांबविले. मित्रांच्या मदतीने मल्लिनाथ याने इब्राहीम यास रूमच्या बाहेर येऊ दिले नाही. चौघांच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रिंटर घ्यायला चला नाहीतर मला एकट्याला जाऊ द्या असे म्हणून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण त्याला बाहेर येऊ दिले नाही. शेवटी स्वच्छतागृहात जातो असे सांगून इब्राहीम बाहेर पडला. जवळच असलेल्या काटेरी झुडपात तो जाऊन बसला. घाबरलेला इब्राहीम रूमकडे परत येत होता. चौघांनी मिळून त्याच्याकडील आठ हजारांचा मोबाईल आणि 20 हजारांची रोकड जबरदस्तीने लुटली. 

इब्राहीम याने चौघांच्या तावडीतून सुटल्यानंतर मंगळवारी रात्री तातडीने दुधनीतील भावाशी संपर्क साधला. बुधवारी सकाळी इब्राहीम व त्याच्या भावाने सलगर वस्ती पोलिसात येऊन घडलेल्या घटनेची फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी लागलीच तपासचक्रे फिरवून आरोपींचा शोध घेतला. मल्लिनाथसह चौघांची चार दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक बी. डी. भुसनूर यांनी सांगितले.

Web Title: 4 Friends looted another friend at solapur