खटाव तालुक्यात टंचाईग्रस्त गावे 40, तीन ठिकाणीच टँकरला मंजुरी

संजय जगताप
शुक्रवार, 4 मे 2018

अनफळे, ढोकळवाडी व पाचवड या तीन गावांसाठी टँकर मंजूर झाले आहेत. तांत्रिक अडचणींमुळे टँकरच्या फेऱ्या झाल्या 
नाहीत. त्या आज नियमित सुरु होतील. काही गावांचे प्रस्ताव आले आहेत. त्यांना मंजुरी मिळताच तेथेही टँकर सुरु करण्यात येतील. 

 - एस. के. झेंडे ( अभियंता, पाणीपुरवठा विभाग, खटाव)

मायणी : खटाव तालुक्यातील चाळीस गावे टंचाईग्रस्त जाहीर झाली असताना केवळ तीन गावांनाच टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजूरी मिळाली आहे. त्यातही गेल्या चार दिवसांत तीनपैकी एकाच गावात टँकरची एक फेरी झाली आणि पाणी 
भरण्याच्या ठिकाणी विजेचा खेळखंडोबा झाला. तालुका व जिल्हा प्रशासनाकडून तहानलेल्या गावांना टँकरचे केवळ गाजर 
दाखविले जात असून, नागरिक कोरड्या घशाने पाण्यासाठी टाहो फोडत असल्याचे चित्र आहे.  

खटाव तालुक्यात गतवर्षी पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे यंदा विविध गावांत अगदी जानेवारी पासूनच पाणी टंचाई भासू लागली. आगामी काळातील पाणी टंचाई लक्षात घेता तालुक्यातील विविध गावांतून टँकरची मागणी करण्यात आली. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. टंचाईत दिवसेंदिवस वाढच झाली. लोक संतप्त होऊन स्थानिक नेते, सरपंच व ग्रामसेवकांना जाब विचारु लागले. मात्र, टँकरची मागणी केली असून, प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट झाले. महिना-दोन महिने उलटले तरी टँकर सुरू होत नसल्याने लोक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करु लागले. 

पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यामार्फत टँकर सुरू होण्यासाठी पाठपुरावा होऊ लागला. विविध गावांनी टँकरसाठी रास्ता रोको, हंडा मोर्चा, घंटानाद, उपोषण अशा विविध आंदोलनाचे हत्यारे उपसणार असल्याचे संकेत दिले. सर्वाधिक पाणीटंचाई असलेल्या कलेढोण गणातील पंचायत समिती सदस्या मेघाताई पुकळे यांनी महिलांचा हंडा मोर्चा काढण्याची तयारीही सुरु केली. 

त्यावेळी प्रशासनाने पाचवड, ढोकळवाडी व अनफळे या तीन गावांसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजुरी दिली. चार 
दिवसांपूर्वी टँकर अनफळे गावासाठी सोडण्यात आला. मात्र पहिल्याच फेरीवेळी पंक्चर झाल्याने तो गावात उशीराने पोचला. तेथील एका आडात तो रिता कऱण्यात आला. लोकांना दिलासा मिळाला. मात्र, दुसऱ्या दिवशी टँकरची वाट पाहून लोक थकले. 
टँकर आलाच नाही. दुष्काळात तेराव्याप्रमाणे टँकर भरण्याच्या ठिकाणचा येरळवाडी तलावातील ट्रान्सफाॅर्मर जळाल्याचे 
सांगण्यात आले. 

अद्याप टँकरची अनफळेत दुसरी फेरी झाली नाही. तर पाचवड व ढोकळवाडीत अद्याप टँकर गेलाच नाही. प्रशासनाच्या हाती केवळ दोन टँकर आहेत. मंजुरी मिळेल तसे टँकर वाढवले जातील असे आश्वासन अधिकारी देत आहेत.

दरम्यान, टंचाईग्रस्त म्हणून जाहीर झालेल्या गावांमध्ये पाण्यासाठी टाहो फोडला जात असताना प्रशासनाकडून टँकरसाठी प्रस्तावच नसल्याचे सांगितले जात आहे. प्रस्तावात त्रुटी असल्याचे प्रत्युत्तर दिले जात आहे. ग्रामपंचायतींनी विहित नमुन्यातील प्रस्ताव सादर करणे आवश्यक असल्याचे सेवकांना तुणतुणे वाजवले जात आहे. त्याहीपुढे जाऊन टंचाईग्रस्त म्हणून जाहीर झालेल्या अनेक गावांनी टँकरचे स्वतंत्र प्रस्ताव दिलेले नाहीत. 

पंचायतींनी केवळ एका ओळीत टँकर सुरू करावा, अशी मागणी 
केली आहे, अशी नानाविद कारणे पुढे करुन प्रशासन टँकर सुरू करण्यात चालढकल करीत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. स्थानिक कारभारी व तालुका आणि जिल्हा प्रशासनाच्या दुष्ट फेऱ्यांत टँकर अडकले असून, त्यामुळे 
तहानलेल्या जीवांचा घसा कसा ओला होणार, की पाणी-पाणी करीत एखाद्याचा जीव जाणार. असा टाहो लोक फोडत आहेत. 

Web Title: 40 villages in drought hit villages in Khatav taluka approval of tanker at three places