सांगलीत कोरोना रूग्णांवर उपचारासाठी 400 खाटांचे हॉस्पीटल लवकरच उभारणार : जयंत पाटील

विष्णू मोहिते | Saturday, 15 August 2020

भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

 सांगली : कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी जिल्हा क्रीडा संकुल सांगलीच्या बाजूला कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी 400 खाटांचे हॉस्पीटल उभा करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाला देण्यात आला असून यावर लवकरच निर्णय होऊन त्याचे काम लवकरच सुरू होईल. कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे गरज नसताना घराच्या बाहेर पडू नये. कोरोनापासून दूर राहण्यासाठी अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. 

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली व राष्ट्रगीत झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली अशोक वीरकर यांनी संचलनाचे नेतृत्त्व केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, महापौर गीता सुतार, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, मिरज पोलीस उपविभागीय अधिकारी संदीपसिंह गिल, पद्मश्री विजयकुमार शहा यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, अन्य पदाधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा- सांगलीत 200 खाटांच्या हॉस्पीटलला मिळणार ग्रीन सिग्नल -

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोना आजाराचा फैलाव वेगाने होत आहे. कोरोना नियंत्रणासाठी शासकीय यंत्रणा गेल्या काही महिन्यापासून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. काही विलंब व अडचणी समजून घेऊन त्यांना सर्वांनी साथ देणे गरजेचे आहे. हे संकट नेहमीचे व साधारण संकट नाही. या संकटाच्या काळात सर्वांनी समजून घेऊन प्रशासकीय काम करणाऱ्या कोरोना योध्यांना साथ देणे गरजेचे आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनिधी यांनीही या संकटाच्या काळात अतिशय चांगले काम केले आहे. कोरोनाबाबत लोकांची जागृती व समजूत घालणे हाच उपाय आहे.

हेही वाचा-संकटातील शेतकऱ्यांना संधी; बेदाणा निर्यातीची होणार ऑनलाईन नोंदणी -

आरोग्य विभागाने 50 वर्षावरील व कोमॉर्बिडिटी असलेल्या नागरिकांची तपासणी मोहीम हाती घेतली  असून त्यांची वारंवार तपासणी व त्यांना काही अडचणी आहेत का हे पाहण्याचे काम आरोग्य यंत्रणा करीत आहे असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोनाच्या काळात कोमॉर्बिडिटी असणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या कोरोनापासून बचाव हाच सर्वोत्तम उपाय आहे. 

कृषी साहित्य खरेदीतील लिपीकापासून संचालकांची कसून चौकशी -

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्याने आत्तापर्यंत अनेक प्रकारच्या आपत्ती पाहिल्या आहेत. पूर, दुष्काळ, गतवर्षीचा भीषण महापूर, अवकाळी पाऊस आणि आता यावर्षी कोरोना. हे सारे आघात पेलताना जिल्हा     प्रत्येकवेळी धैर्याने उभा राहिला. प्रत्येक संकटाने आपल्याला अधिक  कणखर आणि संघर्षशील बनविले. कोरोनाशी लढताना कोणतीही सरावलेली युध्दसामग्री कुचकामी ठरते. अशा परिस्थितीतही जिल्हा खंबीरपणे कोरोना योध्यांच्या, प्रशासनाच्या बाजूने सहनशिलतेने उभा आहे. प्रशासनातील सर्व यंत्रणा झोकून देवून अहोरात्र राबत आहे. सर्व लोकप्रतिनिधीही एकदिलाने साथ देत आहेत. सांगली जिल्हावासियांनी तर संकटाच्या या काळात संयम  बाळगून प्रशासनाला दिलेली साथ अतुलनीय आहे. यासाठी मी सर्वांचाच ऋणी आहे.

जसजशी कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे तसतसे शासकीय रूग्णांलयाबरोबरच खाजगी रूग्णालयेही अधिग्रहित करण्यात येत आहेत. उपचारापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर कार्यान्वीत करण्यात आले आहेत. तसेच काही ग्रामीण रूग्णालयांमधून व उपजिल्हा रूग्णालयांमध्ये डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले आहेत, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा हे सर्व घटक कोणतीही तमा न बाळगता या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र झटत आहे. यांच्या जोडीला खाजगी रूग्णालयातील डॉक्टर्स व त्यांचे सर्व सहकारी यांनीही रूग्ण सेवेचे आपले आद्य कर्तव्य पार पाडण्यासाठी पुढाकार घेणे ही वेळेची गरज आहे. खाजगी क्षेत्रातील सर्व आरोग्य यंत्रणेतील घटक यासाठी संपूर्ण योगदान देतील. आणि मानव जातीच्या इतिहासात उदभवलेल्या या अभूतपूर्व महामारीच्या संकटात आपल्या संपूर्ण क्षमता वापरून योगदान देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 जिल्ह्यात आजमितीस 5 हजार 700 हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.  जवळपास तीन हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधून गत आर्थिक वर्षात 7 कोटी 32 लाखाची तर यावर्षी 10 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच शासनाकडून 4 कोटी 65 लाखाचा निधीही आत्तापर्यंत उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोरोना आज प्रत्येकाच्या दारात आला आहे,  मात्र  त्याला  उंबरठ्यावरुनच  परत  पाठवायचं असेल तर नागरिकांनी घरी राहूनच कोरोनाशी दोन हात केले पाहिजेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.  

हेही वाचा-   ग्रामविकासाचा ध्यास घेतलेली कोकळे ग्रामपंचायत झाली ई-ग्राम -

    
यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते कोरोना योध्दा पुरस्कार डॉ. प्रिया बिडवे, डॉ. अंजना पलकंडी, कक्षसेवक अनिल कांबळे, आशा वर्कर मनिषा कांबळे, साधना खाडे, अरूणा शिंदे, सहिदा जमादार व वर्षा ढोबळे, कोरोना विषयक विशेष कामगिरीबध्दल जमीर पाथरवट, अनिल मादरगे,  कोरोना मुक्त झालेल्या हौसाबाई पाटील, ताराबाई खोत, बाबासाहेब खोत, प्रकाश पांढरे, कोरोना जनजागृतीसाठी पत्रकार दीपक चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादन - अर्चना बनगे.