esakal | 400 किलोमीटर रस्ते सात महिने अवधी; युद्ध पातळीवर यंत्रणा कामाला 
sakal

बोलून बातमी शोधा

 400 kilometers of roads for a period of seven months; The system worked at the war level

सांगली जिल्ह्यातून जाणारे चार राष्ट्रीय महामार्ग, दोन प्रमुख राज्यमार्ग आणि अन्य जिल्हा मार्ग, असे सुमारे 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे गेल्या मार्चपासून थांबली होती.

400 किलोमीटर रस्ते सात महिने अवधी; युद्ध पातळीवर यंत्रणा कामाला 

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : जिल्ह्यातून जाणारे चार राष्ट्रीय महामार्ग, दोन प्रमुख राज्यमार्ग आणि अन्य जिल्हा मार्ग, असे सुमारे 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे गेल्या मार्चपासून थांबली होती. यंदा प्रचंड पाऊस झाल्याने आधी केलेल्या कामांचेही नुकसान झाले. आता पुढील पावसाळ्याआधी या रस्त्यांची कामे पूर्ण करून घ्यावीत, यासाठी युद्ध पातळीवर यंत्रणा कामाला लागली आहे. सात महिन्यांत ही कामे पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा असून, सार्वजनिक बांधकाम विभागानेही तशा सूचना दिल्या आहेत. 

जिल्ह्यातून रत्नागिरी ते नागपूर (क्रमांक 166), पेठ-सांगली-मिरज (166 एच), कराड-तासगाव-जत (266), गुहागर ते विजापूर (कडेगाव मार्गे 166 इ), सिन्नर-नगर, मिरज ते चिक्कोडी (160) हे प्रमुख राष्ट्रीय महामार्ग जातात. पैकी पेठ-मिरज वगळता अन्य रस्त्यांचे कामे सुरू आहेत. दिघंची ते हेरवाड या राज्य मार्गासह दोन मार्गांची कामे हायब्रीड योजनेतून सुरू आहेत. दुसरा मार्ग वाळवा तालुक्‍यातून जातो.

ही कामे कोरोना संकट काळामुळे मार्चनंतर बंद पडली. एप्रिल आणि मे या दोन मुख्य उन्हाळी महिन्यांत डांबरीकरण मार्गी लावणे अपेक्षित होते. त्याच काळात काम थांबले. कामगार आपापल्या राज्यात निघून गेले. पुन्हा पावसाळा सुरू झाला. राज्य मार्गाची काही कामे सुरू झाली. राष्ट्रीय महामार्गांनीही कामाचा झपाटा लावला, मात्र यंदा पाऊस बेसुमार पडला. त्यामुळे पाणी साचून राहिले. राष्ट्रीय महामार्गाचे कॉंक्रिटीकरणही थांबले. मुरमीकरण, खडीकरणाचे टप्पे मात्र या काळात पूर्ण केले गेले. त्यामुळे आता डांबरीकरण आणि कॉंक्रिटीकरणाचे महत्त्वाचे काम बाकी आहे. 

आता दिवाळीनंतर पुढील सहा सात महिने हाती आहेत. या काळात युद्धपातळीवर काम करून रस्ते मार्गी लावण्याचे मोठे आव्हान असणार आहे. विशेषतः राज्य मार्गाची सर्व कामे ही डांबरीकरणाची आहेत. ती पावसाळ्याआधीच संपणे अत्यावश्‍यक आहे. त्याबाबत ठेकेदारांनी गांभीर्याने घ्यावे आणि कामाला गती द्यावी, अशा सूचना दोन्ही यंत्रणांनी दिल्या आहेत. 

पावसाळ्यात डांबरीकरण बंद 
राष्ट्रीय आणि राज्य मार्गाच्या कामात काही ठिकाणी भर पावसाळ्यात डांबरीकरण करण्याचा घाट घातला गेला होता. काही कामेही झाली होती. ती थांबवण्यात आली. पाणी हा डांबराचा पहिला शत्रू. त्यामुळे पावसाळ्यात डांबरीकरण करू नये, असा नियमच आहे. तो ठेकेदारांनी पायदळी तुडवला होता. त्याला अटकाव करण्यात आला. 

अवजड वाहतुकीने रस्त्यांची चाळण 
राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गाच्या कामांसाठी खडीची वाहतूक प्रचंड प्रमाणात सुरू आहे. बहुतांश वाहने ओव्हरलोड आहेत. प्रचंड वजन भरून ती धावताहेत. त्यांनी अनेक उपरस्त्यांची चाळण केली आहे. हे रस्ते दुरूस्त करून देण्याची जबाबदारी अर्थातच या कामाच्या ठेकेदारांनी घ्यावी, यासाठी अनेक ठिकाणी आंदोलन झाली आहेत. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेतही यावर जोरदार चर्चा झाली होती. 

संपादन : युवराज यादव

loading image