#लढा_दुष्काळाशी : चारशेंवर मेंढपाळांनी आटपाडी तालुका सोडला

नागेश गायकवाड
बुधवार, 15 मे 2019

आटपाडी - पाचवीला पूजलेल्या दुष्काळाने मेंढपाळ व्यवसायावर घाला घातला आहे. मोठे कळप केव्हाच मोडीत निघाले. पाचशेवर मेंढ्यांच्या कळपांसह मेंढपाळांनी यंदा तालुका सोडला आहे. तालुक्‍यातील जवळपास चारशेंवर मेंढपाळांनी कुटुंबासह मेंढ्यांसोबत स्थलांतर केले आहे. हे मेंढपाळ कोकण, वाई, सातारा आणि सोलापूर भागात गेले आहेत. 

आटपाडी - पाचवीला पूजलेल्या दुष्काळाने मेंढपाळ व्यवसायावर घाला घातला आहे. मोठे कळप केव्हाच मोडीत निघाले. पाचशेवर मेंढ्यांच्या कळपांसह मेंढपाळांनी यंदा तालुका सोडला आहे. तालुक्‍यातील जवळपास चारशेंवर मेंढपाळांनी कुटुंबासह मेंढ्यांसोबत स्थलांतर केले आहे. हे मेंढपाळ कोकण, वाई, सातारा आणि सोलापूर भागात गेले आहेत. 

भटकंती करूनही मेंढपाळ व्यवसाय अडचणीत आला. माणदेश, आटपाडी तालुक्‍यात धनगर समाज मोठ्या संख्येने आहे. त्यांचा मेंढी पालन हा व्यवसाय पिढीजात आहे. पूर्वी आटपाडी तालुक्‍यात दोन ते अडीच हजार मेंढ्यांचे कळप होते. त्यातील पाचशेंवर कळप मोठे  होते. दिवस बदलत गेले. पाऊस कमी होत गेला. पडीक जमीन पिकाऊ झाली. कुरणांची शेती केली गेली. गावाशेजारची राखीव कुरणे कमी होत आहेत. त्याचा परिणाम मेंढपाळ व्यवसायावर होत आहे. 

कमी होत चाललेल्या पावसाचा तीव्र परिणाम झाला आहे. चांगला पाऊस झाला तर स्थानिक आठ महिने मेंढपाळ व्यवसाय करीत होते. दोन-चार महिने कोकण वा  सोलापूर भागात स्थलांतर करीत होते. अलीकडे व्यवसायला प्रतिकूल दिवस आले आहेत. पाऊस कमी होत चालला. मोठे कळप मोडीत निघाले.

तालुक्‍यात आजघडीला ७०० ते ९०० च्या दरम्यान मेंढ्यांचे मोठे कळप असतील. तेही तीस ते पन्नास मेंढ्यांचे आहेत. यावर्षी कसला तो पाऊस झाला नाही. माळावर मेंढ्यांना हिंडण्यास गवतही उगवले नाही. कडक उन्हामुळे चार  बोटे उगवलेले गवतही जळून खाक झाले. माळावर गवताच्या मुळ्याच दिसतात. त्यावरच एवढे दिवस मेंढ्यांची गुजराण सुरू 
होती.

अनेक मेंढपाळांनी  सोबतीला विकत मिळणारे भुस्कट आणि वैरणी घेतल्या आहेत. त्यावर मेंढ्यांची जपणूक सुरू आहे. ज्यांची  ऐपत नाही असे आणि मोठ्या मेंढपाळ यांनी दोन महिन्यांपासून तालुका सोडला आहे. राहिलेल्या मेंढपाळांचे मात्र हाल सुरू आहेत. एक तर माळरानावर कुसळसुद्धा उगवत नाही. चाऱ्याच्या टंचाईने चारा विकत घ्यावा लागत आहे. 

पिण्यासाठी पाणी नाही. बघेल ती विहीर कोरडी ठणठणीत दिसते. मेंढ्यांना पिण्यासाठी टॅंकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. भुस्कट आणि वैरणसुद्धा विकत घ्यावी लागत आहे. मेंढपाळ व्यवसाय दिवसेंदिवस अडचणीत आल्याने मोडीत निघण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

वडिलांच्या तीनशे मेंढ्या होत्या. आज फक्त ३० आहेत. माळावर कुसळही नाही. विहीर कोरडी आहे. चारा व पाणी विकत घेऊन जपणूक सुरू आहे.
- शंकर मेटकरी,
मासाळवाडी

Web Title: 400 shepherd leave Atapadi Taluka