सांगली जिल्ह्यात 43 हजार ट्रॅक्‍टर; खरेदीचा वेग वाढला

43 thousand tractors in Sangli district; Purchases accelerated
43 thousand tractors in Sangli district; Purchases accelerated

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पूर्वी बैलगाडी मोर्चा निघायचा. आता बैलगाड्या फार राहिल्या नाहीत, ना फार बैल राहिलेत. शेतीच्या यांत्रिकीकरणात ट्रॅक्‍टरचे स्थान मजबूत झाले आहे. ट्रॅक्‍टर हे शेतीचे नवे प्रतीक बनले आहे. जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत तब्बल 25 हजारांहून अधिक नव्या ट्रॅक्‍टरची खरेदी करण्यात आली असून, एकूण ट्रॅक्‍टरची संख्या 43 हजार 284 इतकी झाली आहे. 

दिल्लीतील आंदोलनाने ट्रॅक्‍टर आला केंद्रस्थानी
दिल्लीत शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरू ठेवले आहे. त्यात ट्रॅक्‍टरची संख्या प्रचंड आहे. त्यातच 26 जानेवारीच्या परेडमध्येही ट्रॅक्‍टरचा मोर्चा काढला आणि त्यानंतर जे घडले ते जगाने पाहिले. या आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यात आणि देशातही अनेक ठिकाणी ट्रॅक्‍टर फेरी काढण्यात आल्या. सांगलीत आधी कॉंग्रेसने एसटी स्थानक ते नेमिनाथनगर ट्रॅक्‍टर फेरी काढून शेतकऱ्यांनी समर्थन दिले. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील ट्रॅक्‍टर मोर्चाची सुरवात सांगलीतूनच झाली होती. 

नांगरणीपासून फवारणीपर्यंत 
शेती कामातील ट्रॅक्‍टरचा वापर आता जवळपास शंभर टक्‍क्‍यांच्या घरात आहे. नांगरणी, पेरणी, मळणीपासून ते ऊस फोडणे, तोडणी, वाहतुकीपर्यंत सगळीकडेच ट्रॅक्‍टरचा उपयोग केला जात आहे. द्राक्ष, डाळिंब बागांमध्ये औषध फवारणीसाठीची ट्रॅक्‍टरच उपयोगात येत आहे. शेतीकामांमध्ये मळी वाहतूक, खत वाहतूक यात ट्रॅक्‍टर महत्त्वाचा ठरतोय. व्यावसायिक वापरातील ट्रॅक्‍टरची संख्या सुमारे 12 ते 15 टक्‍क्‍यांच्या घरात आहे. अन्य ट्रॅक्‍टर हे शेतीकामातच अधिक वापरले जात आहेत. 

ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होण्याचे लक्षण
देशात शेतीसाठी ट्रॅक्‍टर खरेदीची आकडेवारी पाहता ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होत असल्याचे स्पष्ट होते. शेतीचे यांत्रिकीकरण झपाट्याने झाले आहे. त्यात ट्रॅक्‍टर केंद्रस्थानी आला आहे. सप्टेंबर 2020 पर्यंत त्या वर्षभरात 1 लाख 8 हजार ट्रॅक्‍टरची विक्री झाली होती. ती 2019 सालच्या तुलनेत 28 टक्‍क्‍यांनी अधिक आहे. एका अहवालानुसार, देशातील सुमारे 19 टक्के शेतकरी स्वतःचा ट्रॅक्‍टर घेण्याची क्षमता ठेवतात आणि ते ट्रॅक्‍टर खरेदी करून यांत्रिक शेतीत "आत्मनिर्भर' होत आहेत. 

टॅक्‍टरचे प्रकार 

  • 18 ते 35 अश्‍वशक्ती 
  • 31 ते 45 अश्‍वशक्ती 
  • 50 ते 70 अश्‍वशक्ती 

ट्रॅक्‍टरचा वापर 

  • 60 टक्के : ट्रॅक्‍टर शेती कामासाठी 
  • 35 टक्के : शेती व वाहतुकीसाठी 
  • 5 टक्के : पूर्ण व्यावसायिक वापर 

ट्रॅक्‍टर खरेदी 

  • छोटे ट्रॅक्‍टर : 50 टक्के रोखीत, 50 टक्के कर्जाव्दारे 
  • मोठे ट्रॅक्‍टर : 70 टक्के कर्जाद्वारे, 30 टक्के रोखीत व्यवहार 

जिल्ह्यातील वाहनांची संख्या 

  • कार ः 7 लाख 54 हजार 
  • जीप ः 97 हजार 328 
  • ट्रक ः 11 हजार 118 
  • टॅंकर ः 901 
  • मालवाहू गाड्या ः 24 हजार 253 
  • ट्रॅक्‍टर ः 43 हजार 284 
  • ट्रॅक्‍टर ट्रॉली ः 20 हजार 464 

वर्षाकाठी जिल्ह्यात किमान 4 हजार ट्रॅक्‍टरची विक्री

सांगल जिल्ह्यात 1990 मध्ये 250 ते 300 ट्रॅक्‍टर वर्षाकाठी विकले जात होते. वर्षाकाठी जिल्ह्यात किमान 4 हजार ट्रॅक्‍टरची विक्री होत आहे. ते उपजीविकेचे प्रमुख साधन बनले आहे. पारंपरिक शेती बाजूला ठेवून यांत्रिक शेती वाढत आहे. 
- जयकुमार बाफना, ट्रॅक्‍टर वितरक, सांगली 

संपादन :  युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com