राज्यातील 430 रुग्णालये बेकायदा, 156 रुग्णालये बंद

Hospital
Hospital

सोलापूर : सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ मांडणाऱ्या सहा हजार 742 नर्सिंग होम व मॅटर्निटी सेंटर आणि दवाखान्यांवर आरोग्य विभागाने काही दिवसांपूर्वी कारवाई केली आहे. त्यापैकी 430 रुग्णालये अथवा मॅटर्निटी सेंटरवर दंडात्मक, मान्यता रद्द, दवाखाना बंद अथवा सिल अशा स्वरूपात कारवाई झाली. त्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर शहर-जिल्ह्यातील खासगी मॅटर्निटी सेंटर, नर्सिंग होम अथवा रुग्णालयांची तपासणी केली जाईल, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. 

राज्याच्या आरोग्य विभाग, पोलिस, महसूल आणि अन्न-औषध प्रशासनाने केलेल्या संयुक्‍त कारवाईत राज्यातील 37 हजार 68 रुग्णालये व नर्सिंग होमची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सहा हजार 312 रुग्णालयांकडे आवश्‍यक ती कागदपत्रेच नसल्याचे समोर आले तर उर्वरित 430 रुग्णालयांवर कडक कारवाई करण्यात आली. त्यामध्ये पुणे, औरंगाबाद, मुंबई, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर या जिल्ह्यांमधील रुग्णालये, नर्सिंग होम व मॅटर्निटी सेंटरचा सर्वाधिक समावेश असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. दरम्यान, बेकायदा क्‍लिनिकना आळा बसविण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने तत्काळ मार्गदर्शक तत्त्वे आखावीत आणि नियमही तयार करावेत, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

राज्यातील नर्सिंग होम/रुग्णालयांवरील कारवाई 
एफआयआर दाखल - 40 
दंडात्मक कारवाई - 196 
कायमस्वरूपी बंद - 156 
मान्यता रद्द - 5 
सिल ठोकले - 7 
नोटीस दिली - 16 
न्यायालयात दाखल - 2 

नर्सिंग होम अथवा मॅटर्निटी सेंटरची परवानगी नसतानाही सुरू केलेल्या अथवा कागदपत्रांची पूर्तता न करताच दवाखाना उघडून सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. काही डॉक्‍टरकडे तेवढी सक्षम पदवी नसतानाही ते रुग्णांवर उपचार करतात. त्या पार्श्‍वभूमीवर अशी कारवाई करण्यात आली. 
- ई. बी. मारुळकर, उपसंचालक, आरोग्य विभाग 

सोलापुरात दोन वर्षांपासून तपासणीच नाही 
डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे अथवा चुकीच्या उपचारामुळे रुग्णाचा मृत्यू झाला, असा आरोप संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांकडून वाढत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाकडून खासगी दवाखाने, नर्सिंग होम, मॅटर्निटी सेंटरची काटेकोरपणे तपासणी करावी, असे आदेश दिले जातात. परंतु, सोलापूर शहर-जिल्ह्यात मागील दिड-दोन वर्षांपासून त्यानुसार संबंधित दवाखान्यांची तपासणीच झाली नसल्याचे दिसून येते. आता लवकरच तपासणी करु असे महापालिका आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले व जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com