जिल्ह्यात 450 कोटींचे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

शेतातील नुकसानीचा दीनानाथ आणि डॉ. सुभाष चंद्रा यांच्या केंद्रीय पथकाने आढावा घेतला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, विभागीय कृषी अधिकारी संजय काचोळे, तहसीलदार प्रशांत पाटील, राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे, तालुका कृषी अधिकारी अशोक साळी आदींचा पथकात समावेश होता.

श्रीरामपूर : परतीच्या पावसामुळे तालुक्‍यातील दिघी येथील बाधित खरीप पिकांची आज प्रत्यक्ष शेतात जाऊन केंद्रीय पथकाने पाहणी केली. दिघी येथील रखमाजी यशवंत पठारे यांच्या शेतातील मक्‍याची, चंद्रकला गायकवाड यांच्या शेतातील सोयाबीनची पाहणी करून माहिती घेतली. 

सुमनबाई हांडे यांच्या शेतातील सोयाबीनचे पावसाने मोठे नुकसान झाले असून, त्यांच्या शेतातील नुकसानीचा दीनानाथ आणि डॉ. सुभाष चंद्रा यांच्या केंद्रीय पथकाने आढावा घेतला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, विभागीय कृषी अधिकारी संजय काचोळे, तहसीलदार प्रशांत पाटील, राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे, तालुका कृषी अधिकारी अशोक साळी आदींचा पथकात समावेश होता. 

दिघी गावाला भेट 
पथकातील सदस्यांचे आज सकाळी शिर्डी येथे आगमन झाले. त्यानंतर त्यांनी 11 वाजता दिघी गावाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर हे पथक बाभळेश्वरमार्गे संगमनेर तालुक्‍यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी रवाना झाले. 

पंचनामे पूर्ण केले 
परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात सुमारे 450 कोटींचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील प्रमुख पिकांच्या नुकसानीची माहिती पथकाला दिली. परतीच्या पावसामुळे खरीप पिकांवर झालेला परिणाम, रब्बी हंगामावरील परिणामाची माहिती पथकाला दिली. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांची नियुक्ती करून पंचनामे वेळेत पूर्ण केल्याची माहिती जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी पथकाला दिल्याचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सांगितले. 

भरीव मदतीची अपेक्षा 
पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. आता केंद्र शासनाने भरीव मदत जाहीर करावी. सोयाबीन, मका पिकाचे 75 टक्के नुकसान झाले आहे. ऑनलाइन पीकविमा भरला असून, ठोस भरपाई मिळायला हवी. पिकांचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या कृषी विभागाकडे कागदपत्रांची पूर्तता केली. केंद्रीय पथकाने शेतात पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला; मात्र शासनाकडून भरीव मदत कधी मिळेल, हा प्रश्न आमच्यासमोर आहे. 
- चंद्रकला गायकवाड, महिला शेतकरी, दिघी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 450 crore loss in Ahmednagar district