थकबाकीदार मिळकतदारांचे वाचले 47.65 लाख 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

सोलापूर - मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या एकवट थकबाकी भरा आणि माफी मिळवा, या "सवलत' योजनेचा लाभ घेत शहर व हद्दवाढ भागातील 1013 मिळकतदारांनी आपले तब्बल 47 लाख 65 हजार रुपये वाचविले. ही सवलत 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. 

सोलापूर - मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या एकवट थकबाकी भरा आणि माफी मिळवा, या "सवलत' योजनेचा लाभ घेत शहर व हद्दवाढ भागातील 1013 मिळकतदारांनी आपले तब्बल 47 लाख 65 हजार रुपये वाचविले. ही सवलत 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. 

महापालिकेच्या हद्दीत 92 ते 95 हजार, तर हद्दवाढ भागात सव्वादोन लाखांपर्यंत मिळकती आहेत. या दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे 70 ते 80 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यातील बहुतांश थकबाकी ही वसूल न होणारी आहे. तसेच शासकीय कार्यालयांकडील थकबाकीही मोठ्या प्रमाणात आहे. थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने वेळोवेळी मोहिमा राबविल्या; मात्र त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात थकबाकीदारांसाठी सवलत योजना राबविण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार थकबाकीदार मिळकतदारांना नोटीस, वॉरंट फी आणि अर्धा टक्के दंड माफ करण्याची योजना जाहीर करण्यात आली. नोटीस आणि वॉरंट फीच्या तुलनेत दंडाची रक्कम मोठी आहे. अर्धा टक्के दंड माफ झाल्यामुळे थकबाकीदारांची सरासरी पाच हजारांपासून ते 50 हजारापर्यंतची बचत झाली आहे. 

वसुलीचे उपलब्ध आकडे पाहिले असता नोटीस व वॉरंट फीच्या तुलनेत दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणात माफ करावी लागली आहे. या सवलत योजनेमुळे महापालिकेचा तोटा झाला असला तरी, नागरिकांचा मात्र फायदा झाला आहे. विशेषतः ज्यांची थकबाकी लाखांच्या घरात आहे, त्यांच्या दंडाची रक्कम अर्धा टक्का केल्याने हजारो रुपयांची बचत झाली आहे. एकवट थकबाकी भरल्यामुळे महापालिकेच्या तिजोरीतही भरणा वाढला आहे. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्‍टोबरमध्ये महापालिकेचे उत्पन्न सुमारे दोन कोटींनी वाढले आहे. हा सवलत योजनेचाच परिणाम आहे. 

असा मिळाला सवलतीचा फायदा (3 नोव्हेंबर 2016 पर्यंत) 

घटक शहर हद्दवाढ एकूण 
लाभार्थी 325 688 1013 
नोटीस फी (रु.) 2,38,772 1,17,678 3,56,450 
वॉरंट फी (रु.) 5,93,816 6,20,051 12,13,867 
अर्धा टक्के दंड (रु.) 12,17,908 19,76,858 31,94,766 

Web Title: 47.65 million save outstanding