एटीएम केंद्रात पैसे भरणाऱ्या दोघांकडून ४८ लाखांचा अपहार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

पेठवडगाव - एटीएममधील पैशाचा अपहार केल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. दोघांनी चार एटीएम मशिनमधील जवळजवळ ४८ लाख १७ हजार १०० रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कर्मचारी गणेश दगडू हारगुडे (रा. चांदोली वसाहत, नवे चावरे), राहुल चंद्रकांत लोहार (निवृत्ती कॉलनी, वारणानगर) यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.

पेठवडगाव - एटीएममधील पैशाचा अपहार केल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. दोघांनी चार एटीएम मशिनमधील जवळजवळ ४८ लाख १७ हजार १०० रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कर्मचारी गणेश दगडू हारगुडे (रा. चांदोली वसाहत, नवे चावरे), राहुल चंद्रकांत लोहार (निवृत्ती कॉलनी, वारणानगर) यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. दोघेही गायब झाले आहेत.

मुंबई येथील राईट बिझनेस सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील अठरा एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम केले जाते. कंपनीत अमित अशोक सावंत (परुळे, ता. राजापूर, रत्नागिरी, सध्या कोल्हापूर) हे शाखा अधिकारी आहेत. कंपनीच्या वतीने २८ कर्मचाऱ्यांकडे विविध बॅंकांच्या एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम आहे. गणेश हारगुडे पाच वर्षे, तर राहुल लोहार सात महिने कंपनीत कामास आहे. दोघे अठरा एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम करतात.

दरम्यान, १५ जुलैला एका कंपनीच्या अधिकाऱ्यांनी एटीएमचे ऑडिट करणार असल्याचे शाखाधिकाऱ्यांना कळवले. यानंतर सावंत यांनी ऑडिटबाबत गणेश व राहुल यांना माहिती दिली. एटीएमचे पासवर्ड व की त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना ऑडिट करुन देण्याबाबत सूचना दिली; परंतु दोघांनी ऑडिट करून दिलेले नाही. यामुळे त्यांच्या व्यवहाराबाबत शंका आली.

त्यानंतर सहा एटीएम तपासलीत. यात जवळपास ४८ लाखांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. आणखी एटीएमचे ऑडिट व्हायचे आहे. याबाबत पेठवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तपास पोलिस निरीक्षक प्रदीप काळे, नाईक विकास माने करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 48 lakh fraud by money uploading workers in ATM center