कोल्हापुरकरांनो घाबरू नका; नौदल आलंय मदतीला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

- राधानगरीचे पाच स्वयंचलित दरवाजे बंद
- धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी
- भोगावती, पंचगंगा काठासाठी दिलासा
- नौदलाच्या पाच टीम मदतीसाठी दाखल

 

कोल्हापूर : पावसाच्या थैमानाने बेहाल झालेल्या सांगली आणि कोल्हापुरात बराच भाग पाण्याखाली गेला आहे. या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी नौदलाच्या पश्चिम विभागाच्या पाच टीम येथे दाखल झाल्या आहेत. राज्य सरकार आणि प्रशासनाच्या मागणीनंतर नौदलाने बचाव कार्याला धाव घेतली असली तरी या टीमला पूरग्रस्त भागात हेलिकॉप्टरने पोचविण्यात अडचणी आल्या.

त्यामुळे या पाचही टीम पुण्यापर्यंत रस्त्याने प्रवास करून आल्या. येथून त्यांना पूरग्रस्त भागात हेलिकॉप्टर द्वारे सोडण्यात येणार असल्याची माहिती नौदलाच्या वेस्टर्न नेव्हल कमांडतर्फे देण्यात आली. अजून पाच टीम नौदलातर्फे तयार करण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, गोव्यातून नौदलाच्या चार टीम या कोल्हापुरातील पूरग्रस्त भागात मदतीसाठी धावल्या आहेत. डायव्हर्ससह असलेल्या या टीम गोव्यातील आयइनएएस हंसा येथून निघून कोल्हापूर विमानतळावर बुधवारी (ता. ७) सकाळी दाखल झाल्या. येथून मुंबईहून आलेल्या टीमसह ते संयुक्तपणे बचावकार्य करणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 teams of Indian Navy reached in Sangli Kolhapur for rescue of flood victims