कोल्हापुरात निम्म्याहून अधिक फलक इंग्रजीत

- सुधाकर काशीद
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - जिथे जी भाषा वाचली जाते, बोलली जाते, समजली जाते, त्याच भाषेत त्या गावातील सर्व दुकान, उद्योग व्यवसायांवरील फलक, हा नियम नव्हे कायदा आहे. अर्थात कोल्हापूर शहराचा विचार करता इथला प्रत्येक व्यावसायिक फलक मराठीतूनच पाहिजे हे स्पष्टच आहे; पण आता जग फार पुढे गेलंय असे म्हणत निम्म्याहून अधिक फलक इंग्रजीत झळकत आहेत. काही ठिकाणी तर कलात्मकता या नावाखाली असे फलक आहेत की, नेमके हे दुकान कशाचे आहे हे कळत नाही.

आज जागतिक मराठी भाषा दिन. मराठी भाषा जपली पाहिजे, रुजली पाहिजे अशा संदेशाची देवाण-घेवाण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र ठळकपणे नजरेस येणाऱ्या फलकांवर इंग्रजीचाच वापर आहे. अर्थात गुमास्ता विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे. दुकानावर कोणत्याही भाषेत मजकूर असण्यास हरकत नाही; पण त्याच फलकावर मराठी भाषेत ठळक मजकूर (दुकानाचे नाव, व्यवसायाचे स्वरूप) नसल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे. महाराष्ट्र आस्थापन व दुकाने अधिनियम कायद्यातच ही तरतूद आहे. पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास परवाना रद्दचाही अधिकार आहे. या कारवाईपूर्वी सात दिवसांच्या नोटिसीतून इशारा व मराठीतच फलक बसवण्याची संधीही आहे.

कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याची गुमास्ता विभागात नोंद करावी लागते. या नोंदीमुळे व्यवसायाचे स्वरूप, कुशल कामगार, अकुशल कामगार, कामाची वेळ, साप्ताहिक सुटीचा दिवस याची नोंद घेतली जाते व परवाना देताना व्यवसायाचे स्वरूप स्पष्ट करणाऱ्या फलकावर मराठी भाषेतच ठळक शब्दांत उल्लेख असला पाहिजे हे स्पष्ट केले जाते. उदाहरणार्थ एखाद्या फलकावर इंग्रजीत दुकानाच्या नावाचा उल्लेख असला तरी चालतो, मात्र त्याच फलकावर इंग्रजीच्या शेजारी तेवढ्याच अक्षरांच्या आकारात मराठीतही उल्लेख आवश्‍यकच असतो. कायद्यान्वयेच ही तरतूद असल्याने त्याची अंमलबजावणी अनिवार्य असते; पण तसे घडत नाही. आज कोल्हापूर शहरात सहज नजर फिरवली तरी बहुतेक फलकांवर इंग्रजीचा ठळक उल्लेख आढळतो. बहुतेक दुकानांसमोर मोठ्या काचा असल्याने हे दुकान नेमके कशाचे हे देखील ओळखत नाही. 

 दंड केला तर सर्व शक्‍य
आज मराठी राजभाषा दिनानिमित्त खरी मराठी भाषा साहित्यातली, की बोलीभाषेतली यावर उलटसुलट मतप्रवाह सुरू आहेत. बऱ्या-वाईट अर्थाने मराठी भाषेबद्दलची तळमळ त्यातून जरूर व्यक्त होत आहे; पण आपल्या आजूबाजूला नजर टाकली तर दुकानावरील फलकावरून मराठीच गायब होऊ लागल्याचे दिसून येते. मराठी भाषेतच दुकानावर फलक असला पाहिजे हा कायदा आहे. या कायद्याची अंमलबजावणी सहज करता येण्याजोगी आहे आणि या अंमलबजावणीला सुरवात होऊन पटापट दंड लागू झाला तरच हे शक्‍य आहे.

Web Title: 50% board english in kolhapur