विठुरायाच्या दर्शन रांगेत 50 हजार भाविक अजूनही उभेच

भारत नागणे
रविवार, 14 जुलै 2019

आज त्रयोदशीच्या दिवशी देखील सुमारे 50 हजारांहून अधिक भाविक दर्शन रांगेत उभे आहेत. सध्या दर्शनाचा वेग वाढवला असला तरी दर्शनासाठी सहा ते सात तासाचा अवधी लागत आहे.

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त देशभरातून सुमारे 12 ते 13 लाख भाविकांनी हजेरी लावत पंढरीत विठुरायाचे दर्शन घेतले.

सावळया विठुरायाच्या दर्शनाची आस लागून राहिलेले लाखो भाविक आजही दर्शनासाठी पंढरीत ठाण मांडून बसले आहेत.
आज (रविवार) त्रयोदशीच्या दिवशी देखील विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांनी गोपाळपूरपर्यंत रांग लावली होती. सावळया विठुरायाच्या भेटीसाठी अजूनही हजारो भाविक पंढरीत मुक्कामी आहेत.

आषाढी एकादशीसाठी पंढरपूरात विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी आलेले भाविक गेल्या काही दिवसांपासून रांगेत उभे राहून दर्शन घेत आहेत. एकादशीच्या दिवशी दर्शन रांग मंदिरापासून पाच किलोमीटरपर्यंत गेली होती. दशमी आणि एकादशी या दोन दिवसांत सुमारे दोन लाखांहून अधिक भाविकांनी विठुरायाचे पदस्पर्श आणि मुखदर्शन घेतले होते.

आषाढी एकादशी दिवशी पंढरीत भक्तीचा महापूर आला होता. अलोट गर्दीमुळे अनेकांना दर्शन घेता आले नाही. एकादशीनंतर आता भक्तांचा महापूर ओसरू लागला आहे. त्यामुळे आता एकादशीच्या दिवशी दर्शन न घेतलेले भाविक दर्शन रांगेत आहेत.

आज त्रयोदशीच्या दिवशी देखील सुमारे 50 हजारांहून अधिक भाविक दर्शन रांगेत उभे आहेत. सध्या दर्शनाचा वेग वाढवला असला तरी दर्शनासाठी सहा ते सात तासाचा अवधी लागत आहे. 

पौर्णिमेच्या गोपाळकाल्याने आषाढीची सांगता होते. पौर्णिमेपर्यंत विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची गर्दी कायम राहणार असल्याचा अंदाज मंदिर समितीने व्यक्त केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 50 thousand devotees still standing in the Darshan line of Vitthal