esakal | या उद्योगाला बसला 5 हजार कोटींचा फटका
sakal

बोलून बातमी शोधा

 5,000 crore hit the textile industry in state

गेल्या दोन वर्षांमध्ये कापूस, सूत, विजेचे वाढते दर व जागतिक बाजारपेठेतील काही घडामोडीमुळे राज्यातील विकेंद्रित यंत्रमाग व्यवसाय नुकसानीत असताना आता कोरोनाच्या संकटामुळे आणखीनच हा व्यवसाय मोडकळीस आला आहे. एकवीस दिवस ठप्प झालेल्या या व्यवसायाचे पाच हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

या उद्योगाला बसला 5 हजार कोटींचा फटका

sakal_logo
By
दिलीप कोळी

विटा (जि. सांगली) : गेल्या दोन वर्षांमध्ये कापूस, सूत, विजेचे वाढते दर व जागतिक बाजारपेठेतील काही घडामोडीमुळे राज्यातील विकेंद्रित यंत्रमाग व्यवसाय नुकसानीत असताना आता कोरोनाच्या संकटामुळे आणखीनच हा व्यवसाय मोडकळीस आला आहे. एकवीस दिवस ठप्प झालेल्या या व्यवसायाचे पाच हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या चार लाख कामगाराच्या रोजगार बुडाला आहे. या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही व्यावसायिक या कामगारांना जीवनावश्‍यक मदत करत आहेत. परंतु ही मदत किती दिवस द्यायची असा प्रश्न आहे.

राज्यात भिवंडी, मालेगाव, इचलकरंजी, सोलापूर, नागपूर, विटा येथे यंत्रमाग व्यवसायाची मोठी केंद्रे आहेत. देशातील मोजक्‍या अत्यावश्‍यक सेवा वगळून इतर सर्व व्यवहार, उत्पादने बंद करण्यात आली आहेत. देशभरातील सर्वात मोठा रोजगार पुरवणारी व प्रचंड मोठी आर्थिक उलाढालींची क्षमता असलेली कापूस, जिनिंग, स्पिनिंग, विव्हिंग, प्रोसेसिंग, गारमेंटिंग ही सर्व वस्त्रोद्योग साखळी पण देशाच्या इतिहासात पहिल्यांदा ठप्प झाली आहे. 

देशात विकेंद्रित विभागामध्ये 20 लाख यंत्रमाग असून यापैकी 50 टक्के अर्थात दहा लाखांपेक्षा जास्त यंत्रमाग महाराष्ट्रात आहेत. पहिल्या टप्प्यातील 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे यंत्रमाग विभागाचे सुमारे 170 कोटी मीटर्स कापड उत्पादन होऊ शकले नाही. त्याची किंमत पाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होते अर्थात पाच हजार कोटी रुपयांचे कापड उत्पादन बुडाले आहे. विकेंद्रित विभागातून केवळ यंत्रमागावर तीन लाख प्रत्यक्ष व एक लाख अप्रत्यक्ष कामगारांचा रोजगार अवलंबून असून या 21 दिवसांत त्यांचा सुमारे 325 कोटी रुपयांचा रोजगार बुडाला आहे. पाच हजार कोटी रुपये किमतीचे कापड उत्पादन बुडाले असल्याने केंद्र व राज्य शासनास मिळणाऱ्या 250 कोटी रुपयांच्या जीएसटी उत्पन्नावर शासनाला थेट पाणी सोडावे लागत आहे. तर महावितरणला या 21 दिवसातला यंत्रमाग वीज वापरापोटीच्या 50 कोटी रुपयांच्या वीज विक्रीकरावर पाणी सोडावे लागत आहे. 

अशा प्रकारे केवळ आपल्या राज्यातील वस्त्रोद्योग साखळीपैकी फक्त यंत्रमाग विभागाच्या पहिल्या 21 दिवसांच्या नुकसानीची आकडेवारी एवढी प्रचंड व भयावह आहे. संपूर्ण वस्त्रोद्योग साखळीचा एकत्रित विचार केला तर हे नुकसान प्रचंड आहे. शिवाय दुर्दैवाने लॉक डाऊन कालावधी जेवढा वाढेल त्या प्रमाणात हे नुकसान आणखी वाढतच जाणार आहे. लॉक डाऊन कधी संपेल हे सांगता येत नाही. त्यानंतर उत्पादन पूर्वपदावर येणे व थांबलेले अर्थचक्र पुन्हा रुळांवर येणे जिकिरीचे व अडचणीचे होणार आहे. 
 

दृष्टीक्षेपात 

  • यंत्रमाग व्यवसायाची मुख्य केंद्रे  : भिवंडी, मालेगाव, इचलकरंजी, सोलापूर, नागपूर, विटा. 
  • यंत्रमाग - 10 लाख 
  • कामगार - 3 लाख प्रत्यक्ष; 1 लाख अप्रत्यक्ष 
  • 21 दिवसांत 325 कोटींचा रोजगार बुडाला 
  • 250 कोटी रुपयांचे शासनाच्या जीएसटी उत्पन्नावर पाणी 
  • 50 कोटी वीज विक्री कर बुडाला 
  • 170 कोटी मीटर कापड उत्पादन बुडाले 

या लघुउद्योगासाठी विशेष सहाय्य योजना हवी

देशावरच्या या भयानक संकटामध्ये राज्यातील सर्व यंत्रमाग लघुउद्योजकांनी तक्रार न करता शासनास व प्रशासनास सहकार्य करायची भूमिका घेतली आहे. या भयावह संकटातून बाहेर आल्यानंतर मात्र अगोदरच अडचणीतून चाललेल्या या लघुउद्योगासाठी विशेष सहाय्य योजना जाहीर केली तरच हा उद्योग पूर्वपदावर येईल. 
- किरण तारळेकर, अध्यक्ष, विटा यंत्रमाग संघ 

loading image