सोलापुरात डॉक्टरची 51 लाख 80 हजारांची फसवणूक

सका
सोमवार, 29 जुलै 2019

श्रीराम फायनान्सकडून लिलावाद्वारे विक्री होणारी वाहने कमी किमतीत खरेदी करून, जास्त किमतीने विकून नफा मिळविण्याचे आमिष दाखवून सोलापुरातील डॉक्‍टरची एक्कावन्न लाख 80 हजारांची फसवणूक झाली.

सोलापूर :  श्रीराम फायनान्सकडून लिलावाद्वारे विक्री होणारी वाहने कमी किमतीत खरेदी करून, जास्त किमतीने विकून नफा मिळविण्याचे आमिष दाखवून सोलापुरातील डॉक्‍टरची एक्कावन्न लाख 80 हजारांची फसवणूक झाली. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला सचिन गडदे (वय 43, रा. सनसिटी अपार्टमेंट दमाणीनगर, सोलापूर) हा फरार आहे. 

अनिल भाकरे (रा. हनुमान मंदिर, भवानी पेठ, सोलापूर), असे फसवणूक झालेल्या डॉक्‍टरचे नाव आहे. त्यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मित्रांच्या ओळखीतून डॉ. भाकरे यांची आरोपी गडदे याच्याशी मैत्री झाली. गडदे याने विश्‍वास संपादन केल्यानंतर श्रीराम फायनान्सकडून लिलावाद्वारे विक्री होणाऱ्या वाहनांची माहिती दिली. दुचाकी आणि चारचाकी वाहने कमी किमतीत खरेदी करून ती बाहेर जास्त किमतीने विकण्याच्या धंद्याविषयी सांगितले.

यात डॉ. भाकरे यांच्या काही मित्रांनी गडदे याच्याकडे गुंतवणूक केली होती, त्यांना चांगला परतावाही मिळाला होता. त्यावर डॉ. भाकरे यांनी विश्‍वास ठेवला. गडदे याच्या सांगण्यानुसार त्यांनी वेळावेळी सात रस्ता येथील कार्यालयात जाऊन अठ्ठावन्न लाख रुपये दिले. त्यावर मिळालेल्या परताव्याची रक्कम म्हणून गडदे याने डॉ. भाकरे यांना सहा लाख 20 हजार रुपये रोख स्वरूपात दिले. उर्वरित 51 लाख 80 हजार रुपये नंतर देतो म्हणून टाळाटाळ केली. त्यानंतर गडदे याचा मोबाईल बंद आहे. तो घरीसुद्धा नाही.

हा प्रकार 20 सप्टेंबर 2018 ते 17 एप्रिल 2019 या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 51 lakh 80 thousand fraud with doctor in Solapur