52 लाखांचे दागिने लुटणारा सांगली जिल्ह्यात गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

सांगली - वाळूंज (ता. खानापूर) येथील बंद बंगल्याच्या टेरेसवरील गेटचे लॉक तोडून तिजोरीत ठेवलेल्या रोख रक्कम आणि दीड किलो सोन्याचे दागिने 52 लाख 71 हजारांचा ऐवज लुटणाऱ्यास विटा पोलिसांनी गजाआड केले आहे. दुकानात काम करणाऱ्या कामगाराच्या मुलाने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

सांगली - वाळूंज (ता. खानापूर) येथील बंद बंगल्याच्या टेरेसवरील गेटचे लॉक तोडून तिजोरीत ठेवलेल्या रोख रक्कम आणि दीड किलो सोन्याचे दागिने 52 लाख 71 हजारांचा ऐवज लुटणाऱ्यास विटा पोलिसांनी गजाआड केले आहे. दुकानात काम करणाऱ्या कामगाराच्या मुलाने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

बिराप्पा सिद्धाप्पा बन्ने (वय 31, रा. सोन्याळ, ता. जत, सध्या रा. वाळूंज, खानापूर) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून 32 लाख 89 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, सोन्याची घडाळे असा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

अधिक माहिती अशी - फिर्यादी जयदीप जनार्दन बाबर वाळूंज येथे राहतात. त्यांचा चेन्नई येथे दागिने उत्पादनाचा उद्योग आहे. त्यांचा वाळूंज येथे बंगला आहे. घरकामासाठी त्यांच्याकडे कामगारही आहेत. घराची देखभाल करण्यासाठी कामगार बिराप्पा सिद्धाप्पा बने याच्याकडे बंगल्याच्या किल्ल्या दिल्या होत्या. बिराप्याचे वडील सिद्धाप्पा तेथेच कामगार आहेत; मात्र या प्रकाराशी त्यांचा काहीही संबंध नाही. 

दरम्यान, बाबर 30 सप्टेंबर रोजी चेन्नई येथे असताना बंगल्याच्या टेरेसवरील गेटचे लॉक कोणीतरी तोडले असल्याचे कामगाराने सांगितले. ते तातडीने गावी आले. त्यांनी बंगल्याचा दरवाजा उघडून पाहिला असता बेडरूमधील तिजोरीतील सोन्याचे दागिने लंपास झाल्याचे निदर्शनास आले.

चोरट्याने एक लाख 20 हजारांचे सोन्याचे तोडे, तीन लाखांच्या सोन्याच्या बांगड्या, एक लाख 20 हजारांची सोन्याची सरी, एक लाख 60 हजारांचे सोन्याचे दोन नेकलेस, एक लाख 20 हजारांच्या सोन्याच्या सहा अंगठ्या, एक लाख 20 हजारांच्या सोन्याच्या दोन वाक्‍या, एक लाखाची सोन्याची दोन जोड, कानातील फुले, एक लाख 60 हजारांचे सोन्याचे वजरहिंक, 80 हजारांचे सोन्याचे दोन नेकलेस, एक लाख 40 हजारांचे सोन्याचे दोन झुपके, 60 हजारांची सोन्याची चेन, 30 हजारांच्या सोन्याच्या दोन चेन, दोन लाखांच्या सोन्याच्या दोन पाटल्या, दोन लाखांचा सोन्याचा एक कोल्हापुरी साज, दोन लाखांची सोन्याची दोन ब्रेसलेट, एक लाख 60 हजारांच्या सोन्याच्या दोन पाटल्या, 30 हजारांच्या सोन्याच्या दोन नथ, दोन लाखांचा सोन्याचा चपलाहार, एक लाख 60 हजारांची सोन्याची एक मोहनमाळ, एक लाख 80 हजारांची सोन्याची दोन मंगळसूत्रे, आठ लाखांची सोन्याचे बेल्ट असलेली तीन मनगटी घड्याळे व तीन लाख रुपये रोख असा 52 लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी विटा पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला. 

गुन्ह्यातील तपासासाठी पथके तयार करण्यात आली. पथकातील पोलिस गस्तीवर असताना संशयित बन्ने पसार असल्याचे निदर्शनास आले. सोन्याळ (ता. जत) येथे असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. चौकशीअंती त्याने चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 32 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले.

अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर अधीक्षक मनीषा डुबुले, उपाधीक्षक अंकुश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रवींद्र शेळके, श्री. लोहार, श्री. सूर्यवंशी, श्री. भोसले, श्री. माळी, श्री. देवकते, श्री. माने, श्री. कुंभार यांचा कारवाईत सहभाग होता. 

जमिनीत लपवले सोन्याचे दागिने 
बिराप्पा बन्ने याने चोरीचा कट रचला होता. चोरीनंतर सारे सोने त्याने जमिनीत लपवून ठेवले होते. चौकशीत त्याने याची माहिती दिली. उर्वरित सात लाखांचा मुद्देमाल त्याने चडचण, सांगली, विटा, लेंगरे येथील बॅंका व सराफी दुकानदाराकडे गहाण ठेवले आहेत. तो मुद्देमालही लवकरच जप्त करण्यात येणार आहे. दिवाळीपूर्वी फिर्यादीस त्यांचा मुद्देमाल परत करण्यात येईल, असे अधीक्षक सुहैल शर्मा यांनी सांगितले. 

कामगारांची माहिती द्या - शर्मा 
पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा म्हणाले,""सराफी दुकानात काम करणाऱ्या कामगारांची माहिती संबंधित पोलिसांना द्यावी. याचे नाममात्र शुल्क आहे; मात्र, जिल्ह्यातील सराफ दुकानदार अशी माहिती पोलिसांना देत नाही. त्यामुळे असे प्रकार घडण्याच्या शक्‍यतेत वाढ होते. या घटनेत कामगारानेच चोरी केल्याचे समोर आले आहे, असे प्रकार थांबविण्यासाठी कामगारांची माहिती पोलिस ठाण्यांना द्यावी.''  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 52 Lakhs Rs jewelry robber arrested in Sangli District