टंचाईनिवारणासाठी 55 कोटींचा आराखडा 

विनायक लांडे
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

55 कोटी 35 लाख 28 हजार रुपये (अंदाजे) खर्चाचा आराखडा आहे. यंदा पावसाने जिल्ह्यात कहर केला. 18 वर्षांतील सरासरीचा विक्रम मोडीत काढला. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत 38 कोटींनी आराखडा कमी झाला.

नगर : ऑक्‍टोबर 2019 ते जून 2020 या कालावधीत संभाव्य टंचाईची शक्‍यता लक्षात घेता, ग्रामीण व नगरपालिका क्षेत्राच्या टंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनाने कृतिआराखडा तयार केला. 55 कोटी 35 लाख 28 हजार रुपये (अंदाजे) खर्चाचा आराखडा आहे. यंदा पावसाने जिल्ह्यात कहर केला. 18 वर्षांतील सरासरीचा विक्रम मोडीत काढला. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत 38 कोटींनी आराखडा कमी झाला. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मंजुरीनंतर हा आराखडा राज्य सरकारला पाठविण्यात आला. 

टंचाई कृतिआराखड्यात 737 गावे, तीन हजार 277 वाड्या-वस्त्यांसाठी एक हजार 258 उपाययोजना प्रस्तावित आहेत. दर वर्षी भविष्यात उद्‌भवणाऱ्या टंचाई स्थितीचे भान ठेवून टंचाईनिवारणासाठी उपाययोजनांचा कृतिआराखडा तयार करण्यात येतो.

हेही वाचा - "जिल्हा नियोजन'चा कारभार आता एका क्‍लिकवर

नगरपालिकांसाठी पाच गावे, 76 वाड्या-वस्त्यांकरिता 55 उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यासाठी अंदाजे चार कोटी 74 लाख रुपये खर्च प्रस्तावित आहे.

उपाययोजनेत टंचाई भासणाऱ्या नगरपालिका हद्दीतील गावांना टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. 
ग्रामीण भागासाठी 732 गावे व 3201 वाड्या-वस्त्यांकरिता 1203 उपाययोजना प्रस्तावित आहेत.

विहिरी खोल करणे- गाळ काढणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण, टॅंकरद्वारे पाणीपुरवठा, प्रगतिपथावरील नळयोजना पूर्ण करणे, नळयोजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहिरी आणि पूरक नळयोजना यांचा समावेश आहे.

गतवर्षी 93 कोटींचा आराखडा होता. मात्र, यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने मागील वर्षाच्या तुलनेत 38 कोटींनी आराखडा कमी झाला. 

जिल्हा प्रशासनाने आगामी काळातील टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या निर्देशाप्रमाणे नियोजन केले आहे. त्यासाठी नऊ प्रकारच्या उपाययोजनांचा कृतिआराखडा तयार केला आहे. 
- प्रशांत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 55 crore for scarcity prevention