
Suresh Khade : कोरोना प्रतिबंधासाठी ५५ कोटी; सुरेश खाडे
सांगली : अन्य देशांत सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रात खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. सांगली शहरासह जिल्ह्यात कोरोनाला सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
आरोग्य यंत्रणा सज्ज असून ५५ कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली. महापालिकेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमांत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून कोरोना कालावधीमध्ये सेवा बजावत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाच्या ५० लाखांचे सानुग्रह अनुदानाचे वाटप पालकमंत्री खाडे यांच्या हस्ते झाले.
आठ कर्मचाऱ्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदानाचे धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचेही अनावरण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त सुनील पवार, माजी आमदार दिनकर पाटील,
स्थायी सभापती धीरज सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्षनेते संजय मेढे, ज्येष्ठ नगरसेवक शेखर इनामदार, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, नीता केळकर यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते.
कोरोना काळात एकूण १२ कर्मचारी मृत झाले होते. यापैकी आठ कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाकडून आलेल्या प्रत्येकी ५० लक्ष रुपये सानुग्रह अनुदानाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. उर्वरित चार कर्मचाऱ्यांचे वारस निश्चिती नंतर त्यांनाही हे अनुदान वितरित केले जाणार आहे.
यापूर्वी महापालिका प्रशासनाकडून या कुटुंबीयांना १० लाख रुपये मदत देण्यात आली होती. आज शासनाकडून आलेल्या ५० लाख रुपये सानुग्रह अनुदानाचे वाटप केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे डोळे पाणावले.
यावेळी बोलताना पालकमंत्री खाडे यांनी कोरोना कालावधीत महापालिका प्रशासनाने चांगले काम केल्याचे गौवोद्गार काढत प्रशासनाचे अभिनंदन केले. ते म्हणाले, ‘‘कोरोना लाटेची परिस्थिती आहे,
मात्र भविष्यात महाराष्ट्रात सारखी परिस्थिती निर्माण झालीच, तर त्याला तोंड देण्यासाठी शासन सज्ज आहे. त्याच पद्धतीने सांगली जिल्ह्यात सुद्धा कोरोना कालावधीत ज्या व्यवस्था सुरू होत्या, त्या पुन्हा कार्यरत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. याचबरोबर ५५ कोटींचा निधी राखीव ठेवला आहे.’’
यावेळी जिल्हा नियोजन समितीकडून महापालिकेला भरघोस निधी दिल्याबद्दल सभापती धीरज सूर्यवंशी यांनी पालकमंत्री खाडे यांचा सत्कार केला. तसेच कोरोना काळात तसेच अनेक आपत्ती काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अग्निशमन अधिकारी विजय पवार आणि टीमचे पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला. स्वागत नगरसचिव चंद्रकांत आडके यांनी केले. उपायुक्त स्मृती पाटील यांनी आभार मानले.
विकासावर भर देऊ; नेत्यांचे बोल
व्यासपीठावर पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील यांच्यासह मान्यवर होते. महापालिकेत महापौर राष्ट्रवादीचे, स्थायी समिती भाजपकडे, तर विरोधीपक्ष नेते काँग्रेसचे अशी परिस्थिती आहे.
यावर सर्वच नेत्यांनी पक्षभेद, वर्चस्ववाद आता बाजूला सारत विकासासाठी एकत्रित येऊ, असे आवाहन खासदार संजय पाटील यांनी केले. राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वाधिनिक निधीसाठी प्रयत्न करू, असे जाहीर केले. नगरसेवक शेखर इनामदार यांनी विकासासाठी निधीची मागणी केली. पालकमंत्री खाडे यांनी विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना दिले.