#MarathaKrantiMorcha मराठा आंदोलनातील 55 जणांना अटक 

#MarathaKrantiMorcha  मराठा आंदोलनातील 55 जणांना अटक 

सातारा - मराठा क्रांती मोर्चानंतर काल साताऱ्यात झालेल्या रणकंदनाप्रकरणी सुमारे अडीच हजार जणांवर खुनाचा प्रयत्न, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, शासकीय कामात अडथळा असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. याप्रकरणी 55 जणांना अटक करण्यात आली असून, 18 अल्पवयीन आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक केलेल्या 55 जणांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे, तर अल्पवयीनांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. 

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान पोलिसांवर दगडफेक झाली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या फिर्यादीनुसार अडीच हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या वेळी झालेल्या दगडफेकीत 34 पोलिस जखमी झाले असून, पोलिस व इतर वाहने, तसेच गाड्यांचे बंद शोरूम व दुकानांच्या झालेल्या तोडफोडीत सुमारे 25 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. 

आंदोलनानंतर पोलिसांनी 73 जणांना ताब्यात घेतले होते. त्यातील 18 जण अल्पवयीन निघाले. त्यामुळे 55 जणांची अटक दाखविण्यात आली. सर्वांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. अल्पवयीन मुलांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. वयाच्या पडताळणीसाठी त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीसाठी पुढील तारीख देण्यात आली आहे. दरम्यान अटक केलेल्या 55 जणांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. 

अटकेतील सर्वांना सात दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. संशयितांकडून अन्य मुलांची नावे निष्पन्न करायची असल्याचे, तसेच दगड व काचा कोणत्या वाहनातून आणल्या याचा तपास करायचा असल्याचे म्हणणे त्यांनी मांडले. आंदोलकांच्या वतीने म्हणणे मांडण्यासाठी ऍड. अमरसिंह काटकर, विकास पाटील- शिरगावकर, ऍड. उमेश शिर्के, युवराज घोरपडे, राजेंद्र गलांडे, संग्राम मुंढेकर, संदेश कुंजीर, अभिजित बाबर यांच्यासह तब्बल 125 वकील न्यायाधीशांसमोर उपस्थित होते. समन्वय समितीचे सदस्यही न्यायालयात हजर होते. 

या घटनेशी संबंध नसतानाही पोलिसांनी 18 अल्पवयीन मुलांसह निरपराधांना अटक केली आहे. अटक घटनास्थळावरून केलेली नाही. कॉलेजच्या मुलांना रस्त्याने जाताना व कॉलेज परिसरातून, तसेच ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांचीही उचलबांगडी केली आहे. त्यांचा उद्देश आंदोलन व दगडफेक करण्याचा नव्हता, याचे पुरावे वकिलांनी मांडले. बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत मुख्य न्यायदंडाधिकारी माने यांनी आंदोलकांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

कऱ्हाडमध्ये 32 जणांवर गुन्हा 
कऱ्हाड शहर परिसरात काल "बंद' पुकारण्यात आला होता. त्यादरम्यान आगलेवाडी, कोपर्डे हवेली, गोटे, वारुंजी फाटा आदी ठिकाणी रस्त्यावर टायर पेटवून टाकण्यात आले होते. त्याप्रकरणी अज्ञात सुमारे 32 आंदोलकांवर गुन्हा झाला आहे. 

आंदोलनात गुरुवारी...  
- फलटण, म्हसवडसह जावळी तालुक्‍यात "बंद' व मोर्चे 
- सातारा- पंढरपूर मार्ग दोन तास अडविला 
- गोंदवले बुद्रुकच्या जिल्हा परिषद सदस्या भारती पोळ यांचा जिल्हाध्यक्षांकडे राजीनामा 
- कोरेगाव तालुक्‍यातील जाधववाडी येथील उपसरपंच श्रीमंत वाघ हेही पदावरून पायउतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com