देशात 550 थेट शेतकरी बाजार सुरु करणार: राधामोहन सिंह

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

कोल्हापूर - शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून देशात 550 थेट शेतकरी बाजार सुरु करण्यात येणार आहेत. या बाजारात कोणतेही दलाल असणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळू शकेल, अशी माहिती कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी आज (मंगळवारी) दिली. करवीर तालुक्‍यातील कणेरी येथे सुरु असलेल्या किसान समृद्धी प्रशिक्षण शिबिरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

कोल्हापूर - शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून देशात 550 थेट शेतकरी बाजार सुरु करण्यात येणार आहेत. या बाजारात कोणतेही दलाल असणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळू शकेल, अशी माहिती कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी आज (मंगळवारी) दिली. करवीर तालुक्‍यातील कणेरी येथे सुरु असलेल्या किसान समृद्धी प्रशिक्षण शिबिरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

ते म्हणाले, "14 करोड शेतकऱ्यांना जमिनीची आरोग्यपत्रिका देण्यासाठी पंतप्रधानां प्रयत्नशील आहेत. यासाठी मातीचे नमुने गोळा करण्यात येत आहेत. आतापर्यंत 1 कोटी 53 लाख मातीचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. 2017 अखेर देशातील सर्व शेतकऱ्यांना आरोग्यपत्रिका देण्यात येतील. महाराष्ट्र राज्य यामध्ये आघाडीवर आहे, ही समाधानकारक बाब आहे. एक अभियान म्हणून आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. टिकाऊ शेती आता महत्वाची असून त्यासाठी कणेरी मठाचे काम महत्त्वाचे आहे. देशात 100 ठिकाणी दीनदयाळ योजनेअंतर्गत केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. परंपरागत कृषी विकास योजना या नावाने ही योजना सुरु आहे. या अंतर्गत 10 हजार क्‍लस्टर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यापैकी 9118 क्‍लस्टर पूर्ण झाले आहेत. प्रत्येक क्‍लस्टर 50 एकराचे आहेत. या योजनेसाठी 597 कोटी रुपये आम्ही विविध राज्यांना दिले आहेत.'

पुढे बोलताना सिंह म्हणाले, "आपण दूध उत्पादनात अग्रेसर आहोत. आता नवीन संकरीत गायींसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. बाहेरील देशांनी आपल्या देशी गायी नेल्या आणि संकर करून दूध उत्पादन वाढवले. आपण मात्र तसेच राहिलो. हा विचार करून मोदी सरकारने प्रयत्न सुरु केले. आंधर व मध्यप्रदेशमध्ये गायीच्या जातीवर संशोधन सुरू केले आहे. देशी गायीच्या वाढीसाठी गोकुळ ग्राम योजनेअंतर्गत आम्ही काम सुरु केले आहे. महाराष्ट्रातही काही ठिकाणी काम सुरु असून यासाठी निधीही वितरित करण्यात येत आहेत.' "मागील सरकारने अनेक घोटाळे केले. पण अनेक योजना निधीअभावी प्रलंबित ठेवल्या. देशातील 56 टक्के कोरडवाहू शेतीला पाणी देण्यासाठी प्रधानमंत्री सिंचन योजना सुरु करण्यात आली आहे. यासाठी 20 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. महाराष्ट्राने तर जलयुक्त शिवार योजना सुरु करून यात आघाडी घेतली आहे. गुजरातमध्ये 95 टक्के ऊस शेती ठिबक सिंचनावर केली जाते. अशीच शेती महाराष्ट्रात करण्याची गरज आहे. पाच वर्षात महाराष्ट्रात ही अशी शेती नक्की होईल', असा विश्‍वास सिंह यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी राज्याचे कृषी पणन मंत्री सदाभाऊ खोत, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय पाटील, हृदयनाथ सिह, अण्णा डांगे आदी उपस्थित होती. मठाधिपती काडसिद्धेश्वर महाराज यांनी प्रास्तविक केले.

कृषीमंत्र्यांच्या अनास्थेबद्दल नाराजी
कृषीमंत्री आले आणि त्यांनी दोन मिनिटांत लखपती शेती पहिली. पत्रकारांच्या एकाच प्रश्नाला उत्तर दिले आणि परिषद गुंडाळून कार्यक्रमाला रवाना झाले. ज्या लखपती शेतीची चर्चा साऱ्या देशभर आहे. त्या शेतीत पाऊलही टाकले नाही, याबाबत उपस्थितीत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

Web Title: 550 direct farmers markets will be formed : Singh