सांगलीत 56 मोबाइल टॉवर सील 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मार्च 2017

सांगली - महापालिकेने थकीत करापोटी मालमत्ताधारकांसह आता मोबाइल कंपन्यांवरही कारवाईचा बडगा उगारला आहे. आज रविवारच्या सुटीच्या दिवशीही पालिकेच्या पथकाने तिन्ही शहरातील 56 मोबाइल टॉवर सील केले. विविध मोबाइल कंपन्यांकडे तीन कोटी 89 लाखांची थकबाकी आहे. रात्री उशिरापर्यंत कंपनींचे अधिकारी, प्रतिनिधी पालिकेत तळ ठोकून होते. 

सांगली - महापालिकेने थकीत करापोटी मालमत्ताधारकांसह आता मोबाइल कंपन्यांवरही कारवाईचा बडगा उगारला आहे. आज रविवारच्या सुटीच्या दिवशीही पालिकेच्या पथकाने तिन्ही शहरातील 56 मोबाइल टॉवर सील केले. विविध मोबाइल कंपन्यांकडे तीन कोटी 89 लाखांची थकबाकी आहे. रात्री उशिरापर्यंत कंपनींचे अधिकारी, प्रतिनिधी पालिकेत तळ ठोकून होते. 

आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी थकीत कर वसुलीसाठी शहरात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. बड्या थकीतदारांना वारंवार नोटिसा देऊनही गांभीर्याने घेतले जात नाही. अशा करबुडव्यांना दणका देण्यासाठी जोरदार मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. दहा दिवसांत ही मोहीम तीव्र केली आहे. त्यामुळे करबुडव्यांचे धाबे दणाणले आहेत. मोहिमेत पाच वॉरंट अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरात एकाचवेळी मालमत्ता जप्तीची ही कारवाई सुरू आहे. चार दिवसांत विविध सहकारी संस्था, साखर कारखाना, पतसंस्थांसह वैयक्तिक मालमत्ता सील केल्या. रविवारी मालमत्ताधारकांबरोबर मोबाइल कंपन्यांच्या टॉवरवरही लक्ष वळवण्यात आले. 

सहायक आयुक्त रमेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली, नितीन शिंदे, काका हलवाई, काका तांबोळी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शहरातील विविध भागात असणारे 56 मोबाईल टॉवर सील केले. यामध्ये सर्वच मोबाईल कंपन्यांचा समावेश आहे. सांगलीत 26, मिरजेत 27 तर कुपवाड परिसरातील तीन टॉवर सील करण्यात आले. या मोबाईल कंपन्यांकडे तीन कोटी 89 लाखांची थकबाकी आहे. मध्यंतरी मोबाईल कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. डिसेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने मोबाईल कंपन्यांची याचिका निकाली काढली आहे. महापालिकांना कर वसुलीचे निर्देश दिले होते. त्यानंतर महापालिकेने वारंवार या मोबाईल कंपन्यांना नोटिसा बजावून थकीत कर भरण्याचे आदेश दिले. पण मार्च महिना संपत आला तरी मोबाईल कंपन्यांकडून फारशी हालचाल झाली नव्हती. अखेर कारवाईचा बडगा उगारला. 

दृष्टिक्षेपात कारवाई 
चार दिवसांत विविध सहकारी संस्था, साखर कारखाना, पतसंस्थांसह वैयक्तिक मालमत्ता सील 
वारंवार नोटिसा देऊनही दुर्लक्ष केल्याने धडक कारवाई 
कारवाईसाठी खास पथकाची नियुक्ती 

मालमत्ताच केली सील 
मोबाईल टॉवरसह महापालिकेच्या पथकाने थकीत करवसुलीसाठी शनिवारी रात्रीपासून चार मालमत्ता सील केल्या. शनिवारी रात्री गणपती पेठेतील सुकुमार भोरे व हिरजी मोरारजी यांची प्रत्येकी सव्वा दोन लाखाची थकबाकी आहे. त्यांची मालमत्ता सील केली. तसेच मालुताई पाटील एक लाख 25 हजार, भाऊसाहेब पाटील माध्यमिक विद्यालय एक लाख 18 हजार, तृप्ती एंटरप्रायझेस एक लाख 75, मिरज तालुका खरेदी विक्री संघ 10 लाख 50 हजार रुपयांच्या थकबाकी आहे. यांच्यावरही कारवाई केली. 

Web Title: 56 mobile tower seal in sangli