सटाणा बाजार समितीची 58 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

The 58th Annual General Meeting of Satana Bazar Samiti
The 58th Annual General Meeting of Satana Bazar Samiti

सटाणा: शेतकरी हित व बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठी समितीच्या आवारात नवीन पेट्रोलपंप उभारणे, कंद खरेदीदार व्यापाऱ्याकडे शेतकऱ्यांचे कांदा विक्रीचे थकीत पेमेंट मिळवून देण्याचा प्रयत्न करणे, शेतकऱ्यांसाठी आर.ओ. द्वारे शुद्ध व थंड पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणे, बाजार समितीत खरेदीदार व्यापाऱ्यांची संख्या वाढविणे आदी प्रमुख मुद्द्यांवर साधकबाधक चर्चा होऊन येथील सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीची 58 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज गुरुवार (ता.27) रोजी संपन्न झाली.

सभेच्या अध्यक्षस्थानी समितीच्या सभापती मंगला प्रवीण सोनवणे होत्या. 
येथील बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आज दुपारी एक वाजता समितीच्या मुख्य कार्यालयासमोर आयोजन करण्यात आले होते. नवीन शासन नियमानुसार संपन्न झालेल्या बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर प्रथमच झालेल्या या सर्वसाधारण सभेत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समितीचे सचिव भास्कर तांबे यांनी इतिवृत्त वाचनास सुरुवात करताच येथील एका कांदा खरेदीदार व्यापाऱ्याकडे शेतकऱ्यांच्या थकीत पेमेंटचा मुद्दा काही शेतकऱ्यांनी उपस्थित केला. बाजार समितीने शेष फंडातून थकीत पेमेंट करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि संबंधित व्यापाऱ्याच्या मालमत्तेवर टाच आणावी, अशी संतप्त मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली. दरम्यान, सभापती मंगला सोनवणे यांनी याप्रश्नी वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना मागवून हा प्रश्न तातडीने निकाली काढण्याचे आश्वासन संचालक मंडळातर्फे दिले.

शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशींचा पुतळा बाजार समिती आवारात उभारणे, लिलावासाठी शेतमाल आणणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचा विमा उतरविणे, बीओटी तत्वावर शेतकऱ्यांना आर.ओ. द्वारे शुद्ध व थंड पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणारी योजना राबविणे, कांदा लिलावानंतर मोजमापाच्या वेळी वांदा घालणाऱ्या व्यापाऱ्यांचा प्रतिबंध करणे, कांदा भरून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या रांगा लावण्यासाठी दिवसरात्र पूर्ण वेळ कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे आदींसह अजेंड्यातील सर्व विषयांना उपस्थित शेतकऱ्यांनी हात उंचावून मंजुरी दिली.

यावेळी झालेल्या चर्चेत जे. के. सोनवणे, पांडुरंग सोनवणे, अरविंद सोनवणे, रत्नाकर सोनवणे, मनोहर देवरे, रावसाहेब भामरे, शरद बोरसे, रोहित अहिरे, संजय पवार, आण्णा सोनवणे, भास्कर सोनवणे, सुदाम बिरारी, जिभाऊ मोरकर आदी शेतकऱ्यांनी भाग घेतला. उपसभापती सरदारसिंग जाधव, संचालक प्रवीण सोनवणे, संजय देवरे, नरेंद्र अहिरे, केशव मांडवडे, संजय बिरारी, प्रकाश देवरे, संजय सोनवणे, प्रभाकर रौंदळ, पंकज ठाकरे, जयप्रकाश सोनवणे, श्रीधर कोठावदे, संदीप साळे, मधुकर देवरे, सुनिता देवरे, वेणूबाई माळी आदींसह शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. केशव मांडवडे यांनी प्रास्ताविक केले. सचिव भास्कर तांबे यांनी इतिवृत्त वाचन तर सभापती मंगला सोनवणे यांनी आभार मानले.

नवीन शासन नियमानुसार निवडणूक झाल्यानंतर पहिली सर्वसाधारण सभा घेणारी राज्यातील सटाणा बाजार समिती ही पहिली बाजार समिती ठरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com