बेळगाव : सहा दिवसांत 18 लाखांचा तोटा, परिवहन महामंडळाला फटका

6 days corona situation effects transportation rupees 18 lakh rupees in belgaum
6 days corona situation effects transportation rupees 18 lakh rupees in belgaum

बेळगाव : कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य सेवेसाठी कर्नाटक सरकारने प्रवाशांसाठी कोरोना चाचणी अहवाल सक्तीचा केला आहे. याचा कर्नाटक परिवहन महामंडळाला रोज सुमारे तीन लाख रुपयांचा फटका बसत आहे. मंगळवार (२३) पासून कोरोना चाचणी अहवालाची सक्ती करण्यात आली असून, गेल्या सहा दिवसांत सुमारे १८ लाखांपर्यंतचे नुकसान परिवहन महामंडळाला सोसावे लागले आहे. कोरोना सक्तीचा अहवाल मागे घेईपर्यंत हे नुकसान परिवहन महामंडळाला सोसावे लागणार आहे.  

गेल्या पंधरा दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे कर्नाटकने खबरदारी म्हणून महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी अहवाल बंधनकारक केला आहे. यामुळे बसमधून ये-जा करणाऱ्यांची संख्याही घटली आहे. वायव्य परिवहन महामंडळाकडे महाराष्ट्रातील बससेवेमुळे रोज सुमारे सहा लाखांपर्यंतचा महसूल जमा होता. मात्र, सध्या केवळ तीन लाखांपर्यंतच महसूल जमा होत आहे. यामुळे वायव्य परिवहन मंडळाला रोज तीन लाखांचा फटका बसत आहे. कोरोना अहवालाच्या सक्तीमुळे महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांनी पाठ फिरविल्याने अनेक बसेस रिकाम्या धावू लागल्याचेही चित्र आहे. 

लॉकडाउनमध्ये २४ मार्च २०२० पासून परिवहनची बससेवा बंदच होती. लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यानंतर खबरदारी घेऊन २३ सप्टेंबरपासून दोन्ही राज्यात आंतरराज्य बससेवा सुरु केली होती. त्यामुळे वायव्य कर्नाटक परिवहनच्या महसुलात वाढ झाली होती. मात्र, गेल्या सहा दिवसांपासून पुन्हा कडक निर्बंध लागू केल्याने प्रवाशांना अडचणी येत आहेत. वायव्य परिवहनच्या बेळगाव विभागातून महाराष्ट्रात सर्वाधिक बसेस जातात. तसेच महाराष्ट्रातूनही मोठ्या प्रमाणात प्रवाशांची या बसेसमधून ये-जा असते. परंतु, कोरोना प्रमाणपत्र सक्तीचे केल्याने प्रवाशांसह परिवहनला फटका बसला आहे. 

"महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे. यामुळे रोज तीन लाखांपर्यंतचे नुकसान होते. सक्ती असेपर्यंत हे नुकसान होतच राहणार आहे."

- के. के. लमाणी, डीटीओ, परिवहन महामंडळ, बेळगाव

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com