वन विभाग यंदा करणार सहा लाख वृक्षांची लागवड

- पुरुषोत्तम कारकल
रविवार, 5 मार्च 2017

सोलापूर - वन विभागाच्या वतीने मागीलवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली होती. यंदाच्यावर्षीही वन विभागाकडून झाडे लावण्यात येणार आहेत. यावर्षी सहा लाख झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक व्ही. व्ही. परळकर यांनी ‘सकाळ’ला दिली.

सोलापूर - वन विभागाच्या वतीने मागीलवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली होती. यंदाच्यावर्षीही वन विभागाकडून झाडे लावण्यात येणार आहेत. यावर्षी सहा लाख झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक व्ही. व्ही. परळकर यांनी ‘सकाळ’ला दिली.

महाराष्ट्र शासनाने एक जुलै रोजी राज्यभर वृक्ष लागवडीचे महाअभियान हाती घेतले होते. या अभियानाच्या माध्यमातून राज्यात कोट्यवधी वृक्षांची लागवड करण्यात आली. जागतिक तापमानवाढ समस्येच्या पार्श्‍वभूमीवर या मोहिमेला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, विविध संस्था, संघटनांनी तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही या मोहिमेत सहभागी होत हजारो ठिकाणी वृक्ष लागवड केली होती. 

वन विभागाकडूनही मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड झाली. यात श्री सिद्धेश्‍वर वन विहारात एक हजार २१४, भंडारकवठे येथे २४ हजार, कोरेगाव येथे ४० हजार, मेंढापूर येथे ५० हजार, हुलजंती येथे २४ हजार, बार्डी येथे १८ हजार, वेळापूर येथे ४२ हजार, शिंगोर्णी येथे १२ हजार, नातेपुते येथे २२ हजार २२०, पिलीव येथे १८ हजार, धर्मपुरी येथे १२ हजार, लोणंद येथे १८ हजार, गिरवई येथे ३० हजार, चांदापुरी येथे २४ हजार, तरंगफळ येथे ३६ हजार, कटफळ २४ हजार, बागलवाडी येथे ३९ हजार २००, मेडशिंगी येथे १९ हजार, यलमार मंगेवाडी येथे १३ हजार ८०० अशी एकूण चार लाख ५९ हजार झाडे वन व सामाजिक वनीकरण विभागाकडून प्राप्त झाली होती. 

यात भर घालून वन विभागाने पाच लाख तीन हजार ४३४ झाडे जिल्हाभरात लावली होती. यावर्षी वन विभागाने सोलापूर जिल्हाभरात तब्बल सहा लाख झाडे लावण्याचा निश्‍चय केला आहे.
 

यंदाच्यावर्षीच्या वृक्ष लागवड अभियानाची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी रोपे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. १५ जूननंतर वृक्ष लागवडीच्या प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.
- व्ही. व्ही. परळकर, सहायक वनसंरक्षक

आकडे बोलतात...
वन व सामाजिक वनीकरण विभागाकडून प्राप्त रोपे : चार लाख ५९ हजार
वृक्षारोपणाची संख्या : 
पाच लाख तीन हजार ४३४
वृक्षारोपणात सहभागी यंत्रणा : १८ हजार ९१३

Web Title: 6 lakh tree plantation by forest department