बेळगावात तब्बल इतके टक्‍के लोक निघाले निगेटिव्हचे पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 August 2020

रॅपिड अँटिजेन टेस्टच्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

बेळगाव : जिल्ह्यात झालेल्या कोरोनाच्या रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये आधी निगेटिव्ह अहवाल आलेल्या ६० टक्के लोकांचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे रॅपिड अँटिजेन टेस्टच्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यात ६,७८१ जणांची रॅपिड अँटिजेन टेस्टच्या माध्यमातून कोरोनाची तपासणी झाली असून, त्यात ५,८०३ जणांचा अहवाल निगेटिव्ह, तर ९७८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, निगेटिव्ह आलेल्यांची पुन्हा तपासणी केल्यानंतर त्यातील ६० टक्के लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे रॅपिड अँटिजेन टेस्ट करताना दोन वेगवेगळे स्वॅब घेण्याचा आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने बजावला आहे.

हेही वाचा - पोलिस उपायुक्‍त यशोदा वंटगुडी यांची बदली; हे आहेत नवे पोलिस उपायुक्‍त..

अँटीजेन तपासणीसाठी नाकातील स्राव तर प्रयोगशाळेतील तपासणीसाठी नाक व घशातील स्राव घेण्यास सांगण्यात आले आहे. रॅपिड अँटीजेनचा अहवाल निगेटिव्ह आल्यास नाक व घशातील स्राव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याची सूचना दिली आहे. अँटीजेनचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास दुसरे स्राव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याची गरज नसल्याचे आरोग्य विभागाने आदेशात नमूद केले आहे.

कोरोना तपासणीचा वेग वाढविण्यासाठी देशात व राज्यातही रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरू केल्या. कोरोनाबाधित व्यक्तींच्या प्रथम व दुय्यम संपर्कातील लोकांसाठी रॅपिड अँटीजेन टेस्टचा पर्याय शोधला होता; पण ठराविक विभागांमध्ये जाऊन सरसकट रॅपिड अँटीजेन टेस्ट केल्या. परंतु, याचा अहवाल नागरिकांसह आरोग्य विभागालाही बुचकळ्यात टाकणारा ठरला आहे. 

हेही वाचा -  तांबवेतील मंडळे यंदा करणार नाहीत सार्वजनिक गणेशोत्सव 

जिल्ह्यात तीन आठवड्यांपासून रॅपिड अँटीजेन टेस्ट मोठ्या प्रमाणात झाल्या. राज्यात आतापर्यंत २ लाख ९० हजार जणांची चाचणी झाली असून त्यात २ लाख ५२ हजार ७२६ जणांचा अहवाल निगेटिव्ह, तर ३७,३५९ लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परंतु, अन्य जिल्ह्यांची तुलना करता बेळगाव जिल्ह्यात रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये निगेटिव्ह आलेले नंतर पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना संख्या जास्त असल्याची चिंता व्यक्त होत आहे.

पर्याय ठरला तकलादू

बेळगाव जिल्ह्याचा आकार मोठा असून राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत बेळगाव जिल्ह्यात कोरोना तपासणीचे प्रमाणही कमी आहे. बेळगावात स्वॅब तपासणीसाठी दोनच प्रयोगशाळा आहेत. त्यामुळे तपासणीचा वेगही कमी आहे. अशा स्थितीत रॅपिड अँटिजेन टेस्टचा पर्याय आरोग्य विभागासमोर होता; पण तो पर्यायही तकलादू ठरला आहे.

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 60 percent people went negative to positive in belgum