अबब! ढवळपुरीत दगावल्या 600 मेंढ्या

 600 sheep killed in Dhawalpuri
600 sheep killed in Dhawalpuri

नगर ः मागील महिन्यात अतिवृष्टीने पारनेर तालुक्‍यातील ढवळपुरी परिसरातील मेंढपाळांच्या 600 मेंढ्या दगावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मेंढ्यांचे पंचनामे व नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी मेंढपाळांच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

शिवाजी खोडदे, बापूराव खताळ, म्हस्कू टकले, मल्हारी हाके, लहानू खताळ, शिवाजी लकडे, सहादू लकडे आदी या वेळी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे, की ढवळपुरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर शेळी-मेंढीपालन व्यवसायावर मेंढपाळ समाजाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसामुळे अनेकांच्या मेंढ्या व जनावरे दगावली आहेत. काहींना तर जगण्यासाठी आधारच राहिला नाही. एकीकडे खरिपाची पिके अतिवृष्टीने उद्‌ध्वस्त झाली. त्यांचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनातर्फे करण्यात आले. मात्र, धनगर समाजाच्या दगावलेल्या पशुधनाबाबत पंचनाम्यांची कार्यवाही झाली नाही. त्यांनी प्रशासनाकडे विनंती, अर्ज, निवेदनेही दिली.

मात्र, दाद मिळत नसल्याची खंत समाजाने व्यक्त केली. अतिवृष्टीच्या संकटात धनगर मेंढपाळांची अनेक कुटुंबे बाधित झाली. प्रत्येक कुटुंबाचे चार ते आठ लाख रुपयांपर्यंत नुकसान झाले आहे. "" ढवळपुरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर धनगर समाजाचे वास्तव्यास आहे. शेळ्या-मेंढ्यांसारख्या पशुधनावर वंशपरंपरेने त्यांचा उदरनिर्वाह चालतो. अतिवृष्टीमुळे ढवळपुरी येथील मेंढपाळांच्या मेंढ्या दगावल्या.

आजही काही मेंढ्या मृत्युमुखी पडत आहेत. हा समाज अल्पशिक्षित आहे. एका मेंढीची किंमत दहा हजार रूपयांपर्यंत आहे. त्यामुळे 600 मेंढ्यांचा विचार करता 60 लाखांपर्यंत साधारणतः नुकसान झाले आहे. अनेकदा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना विनंती करूनही संबंधित अधिकारी दखल घेत नाही. केवळ टोलवाटोलवीची उत्तरे दिली जातात.

जिल्हाधिकाऱ्यांनी तरी या समाजाला न्याय द्यावा. पिढ्यांपिढ्या या व्यवसायावर अबलंबून असणाऱ्या धनगर समाजाची वस्तुस्थितीची जाणीव ठेवून प्रशासनाने कारवाई करावी,'' असे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खोडदे म्हणाले. मागणीचे निवेदन आज धनगर मेंढपाळांच्या प्रतिनिधींनी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना दिले. 

पाटील यांनी दिले आदेश 
पंचनामा, नुकसानभरपाईचे निवेदन धनगर समाजाने दिले. त्यावर तत्काळ संबंधित तहसीलदार आणि पशुसंवर्धन विभागास योग्य कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
- प्रशांत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी 

शासननिर्देशानुसार पुढील कार्यवाही 
ढवळपुरी परिसरात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत प्रसासनाकडून माहिती मिळाल्यानुसार आपण स्वतः परिसरास भेट देऊन धनगर समाजाच्या पशुधनाची माहिती घेईल. त्यानंतर शासननिर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. 
- डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com