सहा हजार शिक्षकांवर बदलीची वेळ?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

प्राथमिक शिक्षणात होणार उलाढाल; दुर्गम शाळांची संख्या वाढणार
सातारा - शिक्षकांच्या नव्या बदली धोरणामुळे प्राथमिक शिक्षण विभागात उलथापालथ होणार आहे. सुमारे सहा हजार शिक्षकांना बदलीला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता शिक्षण क्षेत्रात वर्तवली जात आहे. सुगम-दुर्गम शाळांच्या सर्वेक्षणावर आक्षेप घेतला गेल्याने त्याचे फेरसर्वेक्षण करण्याच्या हालचाली गतिमान असून, दुर्गम शाळांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. 

प्राथमिक शिक्षणात होणार उलाढाल; दुर्गम शाळांची संख्या वाढणार
सातारा - शिक्षकांच्या नव्या बदली धोरणामुळे प्राथमिक शिक्षण विभागात उलथापालथ होणार आहे. सुमारे सहा हजार शिक्षकांना बदलीला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता शिक्षण क्षेत्रात वर्तवली जात आहे. सुगम-दुर्गम शाळांच्या सर्वेक्षणावर आक्षेप घेतला गेल्याने त्याचे फेरसर्वेक्षण करण्याच्या हालचाली गतिमान असून, दुर्गम शाळांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. 

राज्य शासनाने प्राथमिक शिक्षण बदलीसंदर्भात नव्याने धोरण ठरविल्याने राज्यभरातील शिक्षण विभागात वादळ घोंगावू लागले आहे. बदली प्रक्रियेत पहिल्या टप्प्यात सुगम-दुर्गम शाळा ठरविल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शिक्षक बदल्या होणार आहेत. त्यामध्ये दुर्गम शाळांत तीन वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना बदलीचा अधिकार राहणार आहे. प्राथमिक स्थितीत जिल्हा परिषदेने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल ५२८ शाळा दुर्गम, तर २१८८ शाळा सुगम ठरल्या आहे. मात्र, अनेक दुर्गम, डोंगरी भागातील शाळांवर या सर्वेक्षणात अन्याय झाला असल्याच्या तब्बल ३७२ तक्रारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या. तसेच त्यात आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी, सदस्यांनीही आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, शिक्षण सभापती राजेश पवार यांनी घेतला आहे. त्यामुळे दुर्गम शाळांची संख्या ६०० च्या घरात जाण्याची शक्‍यता आहे. 

दुर्गम शाळांत तीन वर्षे सेवा झालेले शिक्षक बदलीस अधिकारप्राप्त असल्याने, तसेच सुगम शाळांत दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले बदलीस पात्र असल्याने त्यांच्या बदल्या होणार, हे निश्‍चित आहे. तसा विचार केल्यास तीन हजार शिक्षकांच्या बदल्या होऊ शकतात. मात्र, प्राथमिक शिक्षण विभागाच्या मते या धोरणानुसार तब्बल सहा हजार शिक्षकांना बदलीला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. त्यादृष्टीने त्यांची कार्यवाही सुरू आहे. या बदल्यांमुळे शिक्षण क्षेत्रात प्रथम इतकी मोठी उलथापालथ होणार आहे. 

आकडे बोलतात...
प्राथमिक शिक्षण विभाग
मंजूर शिक्षक पदे       ८८४२
कार्यरत शिक्षक        ८४७९
रिक्‍त पदे                   ३६६

तालुका बदलून सर्वेक्षण
फेरसर्वेक्षणाची तालुकानिहाय जबाबदारी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांवर दिली जाणार आहे. सर्वेक्षणात त्रुटी राहू नयेत, यासाठी तालुका बदलून सर्वेक्षण केले जाईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांनी दिली.

बदलीचे टप्पे...
सुगम-दुर्गम शाळा अंतिम करणे
तालुकानिहाय समान जागा रिक्‍त करणे
विशेष संवर्गातील बदल्या करणे
अधिकारप्राप्त व पात्र शिक्षकांच्या बदल्या करणे

Web Title: 6000 teacher transfer time