67 वर्षांत अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाचा प्रथमच ऑनलाईन प्रयोग; हृषिकेश बोडस यांच्या गायनाने प्रारंभ 

प्रमोद जेरे
Monday, 19 October 2020

67 वर्षांच्या इतिहासात प्रथमच फेसबुक ऑनलाईन पद्धतीने यावर्षी अंबाबाई नवरात्र महोत्सवास (शनिवारी) प्रारंभ झाला.

मिरज (जि . सांगली)  : 67 वर्षांच्या इतिहासात प्रथमच फेसबुक ऑनलाईन पद्धतीने यावर्षी अंबाबाई नवरात्र महोत्सवास (शनिवारी) प्रारंभ झाला. मिरजेचे ख्यातनाम ज्येष्ठ गायक ऋषिकेश बोडस यांनी शास्त्रीय गायनाने या महोत्सवाचे पहिले पुष्प गुंफले. 

सार्वत्रिक कार्यक्रमांना अद्याप परवानगी मिळत नसल्याने यावर्षीच्या नवरात्र संगीत महोत्सवाबाबत अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या. कोरोनामुळे हे निर्बंध आल्यामुळे अंबाबाई मंदिराचे विश्वस्त आणि संगीत महोत्सव संयोजकांनी यावर्षीचा नवरात्र संगीत महोत्सव फेसबुकद्वारे ऑनलाईन पद्धतीने आयोजितचा निर्णय घेतला.

त्याप्रमाणे ही संगीत सभा ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली. यामध्ये स्थानिक कलाकारांना अधिकाधिक संधी देण्याचेही धोरण महोत्सवाच्या संयोजकांनी स्वीकारले. त्याचाच एक भाग म्हणून संयोजकांनी आज पहिल्याच पुष्पात मिरजेचे ख्यातनाम ज्येष्ठ गायक ऋषिकेश बोडस यांच्या हस्ते या संगीत महोत्सवाचे उद्‌घाटन केले. त्यांनी प्रथम बिहाग रागातील बंदिशी पेश केल्या. यापैकी "कैसे सुख सोये, दुर्गे महाराणी या बंदिशी तर अत्यंत सुरेलपणे सादर केल्या. बिहाग रागातील तराणाही त्यांनी पेश केला. 

त्यानंतर दुर्गा रागातील माता भवानी ही बंदिश आणि तराना सादर केला. आपल्या मैफलीचा समारोप "ये गं अंबाबाई करी कृपा' या संत ज्ञानेश्वरांच्या अभंग गायनाने केला. त्यांना तबलासाथ विनायक हसबनीस यांनी तर संवादिनी साथ सारंग सांभारे यांनी केली. 

अंबाबाई देवालय बंदच 
सध्या देवीचे नवरात्र सुरू असल्याने केवळ प्रथेप्रमाणे सर्व पूजाअर्चा आणि विधी सुरू आहेत, परंतु महिलांसह कोणत्याही भक्तांसाठी देवीचे दर्शन खुले नाही. संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अद्याप मंदिरे खुली केली नसल्याने यावर्षी महिलांना अंबाबाई देवालयात जाऊन देवीचे दर्शन घेता येणार नाही, असे नवरात्र संयोजकांनी जाहीर केले आहे. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In 67 years first time online organisation of Ambabai Navratra Music Festival; Started by Hrishikesh Bodas