
दोघांना अटक; शेत जमीन व प्लॉट देण्यासाठी घेतले पैसे; संशयित बामणोली व कोल्हापुरातील
सांगली : शेत जमीन आणि प्लॉट घेण्यासाठी दिलेले ६९ लाख रुपये परत देण्यास टाळाटाळ करून धमकी देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. महादेव हणमंत पाटील (वय ३३, रा. बामणोली, ता. मिरज) व अमर शंकर आंबेकर (२१, रंकाळा टॉवर, पानारी मळा, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. नीता भारत सावंत (४१, रा. दत्तनगर, वसंतनगर) यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा- पसार संशयितांना शोधण्याचे आव्हान ; गोविंद पानसरे हत्येस सहा वर्षे पूर्ण
पोलिसांनी दिलेली माहिती अशी
नीता सावंत या शिक्षिका आहेत. पती भारत सावंत यांना शेतजमीन आणि प्लॉट खरेदी करून देण्यासाठी नीता यांनी शिक्षक बॅंक, खासगी प्राथमिक शिक्षक सेवक पतसंस्था, प्राथमिक शिक्षक सेवक सोसायटी येथून दोन वर्षांपूर्वी कर्ज काढले होते. कोटक महिंद्रा बॅंक आणि स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या खात्यावरून एप्रिल २०१९ ते एप्रिल २०२० या दरम्यान नीता यांनी संशयित महादेव पाटील याला प्लॉट व शेती घेण्यासाठी रोखीने व ऑनलाईन खात्यावर ३८ लाख रुपये दिले होते. तसेच, संशयित अमर आंबेकर याला शेती घेऊन शेतात हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी रोखीने आणि ऑनलाईन ३५ लाख रुपये दिले होते. दोघांना ७३ लाख रुपये दिल्यावर सावंत दांपत्य आर्थिक अडचणीत आले होते.
अडचणीमुळे त्यांनी संशयित महादेव व अमरकडे पैसे परत मागितले. तेव्हा अमरने चार लाख रुपये परत केले. उर्वरित ६९ लाख रुपये परत देण्यासाठी भारत सावंत यांनी पाठपुरावा केला. तेव्हा दोघांनी पैसे देण्यास नकार दिला. तसेच, परत पैसे मागितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली.
तब्बल ६९ लाख रुपये अडकल्याने भारत सावंत यांना मानसिक त्रास झाला. या त्रासाला कंटाळून भारत सावंत यांनी ६ जून २०२० ला राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पती भारत यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यास संशयित महादेव व अमर हे दोन जण कारणीभूत असल्याची फिर्याद नीता यांनी काल (ता. १८) सायंकाळी दिली. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून रात्री उशिरा अटक करण्यात आली.
संपादन-अर्चना बनगे