कोल्हापूरचे सात भाविक ठार

कोल्हापूरचे सात भाविक ठार

मिरज-पंढरपूर मार्गावर मिनी बसला भीषण अपघात; तीन मुलांचा समावेश

कवठेमहांकाळ - पंढरपूरहून देवदर्शन घेऊन गावी निघालेल्या भाविकांवर आज पहाटेच्या सुमारास काळाने घाला घातला. मिरज-पंढरपूर राज्य मार्गावरील आगळगाव फाट्याजवळ शेळकेवाडी (ता. कवठेमहांकाळ) हद्दीत रस्त्याकडेला बंद पडलेल्या वाळूच्या ट्रकला मिनी बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात सहा जण जागीच ठार झाले, तर एका महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. बारा जण जखमी झाले. पैकी तिघे गंभीर आहेत. नऊ जण किरकोळ जखमी आहेत. 

पहाटे चारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघातातील मृत कोल्हापूरजवळील गांधीनगरचे आहेत. 

मृतांमध्ये विनायक मार्तंड लोंढे (वय ५०), रौनक राजू नरंदे (९), लखन राजू संकाजी (३०), रेणुका नंदकुमार हेगडे (३५), नंदकुमार जयराम हेगडे (४०), आदित्य नंदकुमार हेगडे (१३) आणि रेखा देवकुळे (४०, सर्व रा. मागासवर्गीय गृहनिर्माण सोसायटी, कोयना कॉलनी, वळिवडे-गांधीनगर) यांचा समावेश आहे. स्नेहल ऊर्फ नेहा कृष्णात हेगडे (२०), काजल कृष्णात हेगडे (१९), कल्पना शाहू बाबर (३५), कोमल सुनील हेगडे (२१), शीला सुनील हेगडे (३९), सारिका संजय कांबळे (४०), शुभम संजय कांबळे (८), भारती संजय कांबळे (२०), सावित्री बळवंत आवळे (५५), अनमोल नंदकुमार हेगडे (१२), श्वेता कृष्णात हेगडे (१५), गौरी ऊर्फ संस्कृती कृष्णात हेगडे (८) जखमी आहेत. 

याबाबतची माहिती अशी - गांधीनगर येथील १५ ते २० भाविक देवदर्शनासाठी सोमवारी मिनी बसने निघाले होते. पाच दिवस विविध ठिकाणी देवदर्शन केले. त्यानंतर काल पंढरपूरला देवदर्शन करून सर्व जण पंढरपूर-मिरज मार्गावरून परतत होते. पहाटे चारच्या सुमारास आगळगाव फाट्याजवळ शेळकेवाडी गावच्या हद्दीत रस्त्यावर बंद पडलेल्या वाळूच्या ट्रकला मिनी बसने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती, की मिनी बसचा चक्काचूर झाला. बसमध्ये झोपेत असलेल्या भाविकांपैकी सहा भाविक जागीच ठार झाले. १२ जण गंभीर जखमी झाले. धडकेनंतर खडबडून जाग आलेल्या प्रवाशांनी आरडाओरडा केला. जखमी झालेले प्रवासी कसेबसे बाहेर पडले. 

अपघातानंतर काही वेळातच परिसरातून लांडगेवाडीचे (ता. कवठेमहांकाळ) माजी सरपंच अरुण भोसले जात होते. त्यांनी तत्काळ कवठेमहांकाळ पोलिसांना कळवले. पोलिस मदतीसाठी धावले. गंभीर जखमी चौघांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांपैकी रेखा देवकुळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपविभागीय पोलिस अधिकारी नागनाथ वाकुडे, पोलिस उपनिरीक्षक सचिन वसमाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, किरकोळ जखमींवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. गंभीर जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

मिनी बसचा चक्काचूर
अपघातात मिनी बसचा चक्काचूर झाला होता. ट्रक जाग्यावरून तसूभरही हलला नसल्याचे चित्र होते. अपघातानंतर परिसरात जाणारे अनेक वाहनधारक घटनास्थळी थांबून चक्काचूर झालेली मिनी बस पाहत होते. घटनास्थळाचे चित्र पाहूनच अपघाताची भीषणता लक्षात येत होती.

रिफ्लेक्‍टरअभावी अपघात-
मिरज-पंढरपूर राज्यमार्गावर बंद अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रकवर इतर वाहने आदळून काही जणांना यापूर्वी जीव गमवावा लागला आहे. आज देखील भीषण अपघातात सात जणांना जीव गमवावा लागला. रस्त्याकडेला बंद अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रकचालकाने अपघात होऊ नये म्हणून रिफ्लेक्‍टर, रेडियम पट्टी किंवा लाल कापड, झाडाचा पाला वगैरे काहीही ट्रकला लावले नसल्याचे पोलिस तपासात निदर्शनास आले.

मृत एकाच गल्लीतील

अपघातात ठार झालेले सात भाविक एकाच गल्लीतील आहेत. पाच दिवसांची देवदर्शन यात्रा करून परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. अपघातात पती-पत्नी व मुलगा जागीच ठार झाले. रौनक हा ९ वर्षांचा मुलगाही ठार झाला.
 

देवदर्शन अखेरचे ठरले!

गांधीनगर - हेगडे, देवकुळे कुटुंबीय दरवर्षी सौंदत्ती यात्रेला जातात. नेहमीप्रमाणे यंदाही त्यांनी मिनी बस आणि मोटार भाड्याने घेतली. सोमवारी (ता. १७) सकाळी गांधीनगर येथून सर्व जण सौंदत्तीला जाण्यास बाहेर पडले. सर्वांनी सौंदत्ती येथे रेणुकामातेचे दर्शन घेऊन बुधवारी तेथून निघाले. 

तुळजापूर, बदामी, अक्कलकोट, पंढरपूर येथे देवदर्शन केले. गुरुवारी रात्री पंढरपुरातून बाहेर पडले. एके ठिकाणी जेवण केले. रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. वाटेत आगळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे रस्त्यावर वाळूने भरलेला ट्रक थांबला होता. मिनी बसची ट्रकला जोराची धडक दिली. अपघाताचे वृत्त समजताच परिसरावर शोककळा पसरली.

आज सकाळी सहाच्या सुमारास येथील म्हसोबा माळ येथे अपघाताची माहिती समजली. परिसरातील नागरिक जमा होऊन त्यांनी दूरध्वनीवरून माहिती घेतली. अपघातग्रस्तांचे काही नातेवाईक तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले. त्यानंतर डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे वैद्यकीय पथकही घटनास्थळाकडे रवाना झाले. सकाळी दहाच्या सुमारास आमदार अमल महाडिक यांनी म्हसोबा माळ येथे भेट देऊन अपघात झालेल्यांच्या नातेवाइकांचे सांत्वन करून अंत्यविधीसाठी दहा हजार रुपयांची मदत देऊ केली. सायंकाळी पाचच्या सुमारास मृतदेह गांधीनगर येथील म्हसोबा माळ येथे आणण्यात आले. फुलांनी सजविलेल्या दोन ट्रॅक्‍टरमधून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेमध्ये आमदार अमल महाडिक, पंचायत समितीचे सभापती प्रदीप झांबरे, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे सभापती विशांत महापुरे, गोकुळचे माजी संचालक बाबासाहेब चौगुले, माजी पंचायत समिती सदस्य सरदार मिसाळ, आमदार सतेज पाटील यांचे ग्रामीण संपर्कप्रमुख बजरंग रणदिवे व परिसरातील नागरिक सहभागी झाले. गांधीनगरच्या मुख्य मार्गावरून अंत्ययात्रा स्मशानभूमीमध्ये आली. तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनमोलचे कुटुंब उद्‌ध्वस्त
या प्रवासामध्ये मोटारीमध्ये बसलेले अनमोल नंदकुमार हेगडे हिची आजी, आई, वडील आणि भाऊ सर्व जण या अपघातात मरण पावल्याने अनमोलला मानसिक धक्का बसला. तिचे संपूर्ण कुटुंबच उद्‌ध्वस्त झाले. 

कुटुंब मोलमजुरी करणारे
अपघातात मरण पावलेले सर्व जण मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आवश्‍यक मदत आमदार अमल महाडिक यांनी केली. त्याचबरोबर येथील पत्रकार बंधू, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये, सामाजिक कार्यकर्ते अमोल एकल, सौ. हेमलता माने यांनीही मदतीचा हात दिला. परिसरातील लोकांनी वर्गणी काढून मदत केली. निवास लोखंडे, राजू ठोमके, अभिजित अवघडे, रोहन बुचडे, प्रदीप पाटील, महेश हेगडे, अनिल हेगडे, जयवंत कांबळे आदींनी सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com