अबब ! झाडांवर मारलेले खिळे निघाले सात किलोचे

मोहन मेस्त्री
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

दृष्टिक्षेपात मोहीम...

  •   महाद्वार रोडवरील झाडांची दीडशे खिळ्यांतून मुक्तता
  •   वृक्षप्रेमींच्या आवाहनाला जाहिरातदारांकडून प्रतिसाद
  •   इस्लामपूर, जयसिंगपूर येथील व्यावसायिकांच्या जाहिराती शहरातील झाडांवर

कोल्हापूर  - ‘झाडे लावा, झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवा’ असा संदेश दिला जात आहे. एकीकडे वृक्ष तोडीच्या तक्रारीत वाढ होत आहे, तर दुसरीकडे पर्यावरणप्रेमी आणि निसर्गप्रेमी यांची संख्या वाढत असल्याची समाधानाची बाब आहे.

अशा प्रकारचे काम करणारा वृक्षप्रेमी ग्रुप शहरात विविध ठिकाणी केवळ वृक्ष लावत नाहीत, तर त्यांची वर्षभर जोपासनाही करत असतात. आता तर शहरातील शेकडो झाडांवर मोठमोठे खिळे ठोकून अडकवलेले जाहिरातीचे फलक काढण्याचे काम ही संस्था गेले दोन महिने करीत आहे.

झाडांवरील फलक आणि खिळे काढून जणू झाडांना या वेदनेतून मुक्त करण्याचे काम या संस्थेचे सभासद पहिल्या रविवारी करत आहेत. गेल्या दोन महिन्यांत या कार्यकर्त्यांनी शहरातील जवळपास २५० हून अधिक लहान मोठे फलक आणि सहा ते सात किलो खिळे काढून शेकडो झाडांना वेदनामुक्त केले. 

असा आहे वन विभागाचा कायदा

पर्यावरणप्रेमी झाडांची तोड करु नका झाडांनाही संवेदना असतात. अशाप्रकारचा प्रचार वनविभाग करीत असतो. तसेच झाडांची कत्तल करणाऱ्यांना कठोर शिक्षेचीही कायद्यात तरतूद आहे. १९७५ च्या वन विभागाच्या कायद्यानुसार झाडांवर खिळा मारणे, बोर्ड लावणे, झाडांना इजा होईल अशाप्रकारचे कृत्य करणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. 

शहरातील विविध भागांतील रस्त्याकडेला अनेक मोठमोठी झाडे शहरवासीयांना गारवा देण्याचे काम करत आहेत, पण शहरातील अनेक व्यावसायिक आपल्या व्यवसायाची माहिती होण्यासाठी मुख्य रस्त्यावरील झाडांवर खिळे ठोकून जाहिरातीचे आणि दिशादर्शक फलक लावत असतात. खरेतर अशा फलकांना कायद्याने बंदी असतानाही महापालिका मात्र असे फलक लावण्यासाठी बंदी न घालता या फलकांची फी वसूल करते, हा विरोधाभास आश्‍चर्यकारक आहे.

शहरातील रस्ते प्रकल्प राबवताना हजारो झाडांची कत्तल झाली अनेक बांधकामे करताना झाडांचा बळी घेतला गेला असे असताना आपला क्‍लास, खानावळ, पार्लर, चटणी मसाल्यांची जाहिरात करणारे फलक झाडांवर लटकलेले दिसतात. मात्र, वृक्षप्रेमी संस्थांनी केवळ हे फलक काढण्याचे काम केले नाही, तर संबंिधतांना झाडांनाही वेदना होतात त्यांचे आयुष्य कमी होते. असे सांगून आपण एखादे झाड लावून जगवण्याचा संदेश दिला. याला अनेक जाहिरातदारांनी प्रतिसाद देत झाडे लावण्याचे मान्य केले. 

दृष्टिक्षेपात मोहीम...

  •   महाद्वार रोडवरील झाडांची दीडशे खिळ्यांतून मुक्तता
  •   वृक्षप्रेमींच्या आवाहनाला जाहिरातदारांकडून प्रतिसाद
  •   इस्लामपूर, जयसिंगपूर येथील व्यावसायिकांच्या जाहिराती शहरातील झाडांवर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 7 KG Nails Removed From Trees In Kolhapur City