जिल्ह्यात 70 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

824 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद

824 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद
सातारा - खर्शी बारामुरेजवळ (ता. जावळी) खासदार उदयनराजे भोसले यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर वसंतराव मानकुमरे समर्थकांनी दगडफेक केल्याची घटना, नागठाणेत मतदान यंत्रांचा घोळ, वनवासवाडी, गोडोली, शाहूपुरीत मतदार याद्यांतून गायब झालेली नावे या सर्व घटनांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्या 64 आणि पंचायत समित्यांच्या 128 जागांसाठी चुरशीने 70 टक्के मतदान झाले. 824 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद झाले. गुरुवारी (ता. 23) सकाळी दहा वाजता प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आज जिल्ह्यात 2584 मतदान केंद्रांवर मतदान झाले. काही घटना वगळता जिल्ह्यात चुरशीने; पण शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच मतदानात उत्साह होता. सर्वाधिक मतदान खंडाळा व महाबळेश्‍वर तालुक्‍यांत झाले असून, सर्वात कमी मतदान जावळी व पाटण तालुक्‍यांत झाले.

ग्रामीण भागात उमेदवारांच्या गावांतील केंद्रांवर सकाळपासूनच मतदानासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. शाहूपुरीतील एका मतदान केंद्रावरील मतदान यंत्र बंद पडल्याने पंधरा मिनिटे मतदान प्रक्रिया थांबली होती. बावधन, निकमवाडी (ता. वाई) येथे सदोष मतदान यंत्रे बदलावी लागली. उर्वरित ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रिया झाली. जावळी तालुक्‍यात मात्र, कालपासून सुरू असलेली दोन राजांची धुमश्‍चक्री दुसऱ्या दिवशीही सुरूच होती.

- मलवडी (ता. माण) मिरजे (ता. खंडाळा) येथे दोन तास मतदानयंत्र बंद
- नागठाण्यातही मतदान यंत्रात गोंधळ...
- खंडाळ्यात 83 वर्षीय वृद्धेचे मतदानानंतर निधन

जिल्हा परिषद- पंचायत समित्यांसाठी तालुकानिहाय मतदान (टक्‍क्‍यांत)
सातारा 64, जावळी 65, कोरेगाव 69, वाई 70.43, खंडाळा 73.05, महाबळेश्‍वर 73, माण 71.17, खटाव 70, फलटण 69.9, कऱ्हाड 67, पाटण 65.

Web Title: 70 percent voting in satara district