K-OK 71000 farmer involve in crop insurance ‘पीक विमा’त ७१ हजार शेतकऱ्यांचा सहभाग  | eSakal

‘पीक विमा’त ७१ हजार शेतकऱ्यांचा सहभाग 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

काशीळ - ऑनलाइनसाठी सर्व्हर डाउनची समस्या, सातबारा उतारा मिळण्यातील अडचणी असे असूनही यंदाच्या खरीप हंगामासाठी सातारा जिल्ह्यात जुलैअखेर ७० हजार ९५७ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी हप्ता भरला. गतवर्षी इतक्‍याच शेतकऱ्यांनी यंदा पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. 

जिल्ह्यात गेल्या तीन-चार वर्षांपासून खरिपातही पीक विमा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र दोन लाख ९० हजार हेक्‍टर इतके निश्‍चित केले आहे; त्यापैकी दोन लाख ६५ हजार ४१६ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यामध्ये सोयाबीनची सर्वाधिक ५९ हजार ५८५ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. सोयाबीनसह बाजरी, भात, खरीप ज्वारी, भुईमूग शेंग आदी पिकांचा पेरणीत समावेश आहे. जुलैअखेर ७० हजार ९५७ शेतकऱ्यांनी विमा भरला होता.

गतवर्षी ६९ हजार २४८ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. विम्यासाठी सातारा जिल्ह्यासाठी दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे जबाबदारी आहे; पण यंदा सुरवातीपासूनच ऑनलाइन सर्व्हर डाउन, सातबारा उताऱ्यातील अडचणींमुळे शेतकऱ्यांना पीक विमा घेताना अडचणी आल्या आहेत. 

सर्वाधिक पीक विमा जिल्हा बॅंकेत 
शेतकऱ्यांनी सर्वाधिक पीक विम्याचा हप्ता सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत भरला आहे. पीक विमा योजनेत सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांमध्ये ५८ हजार ६०० हे कर्जदार तर १२ हजार ३५७ हे बिगर कर्जदार आहेत. 

Web Title: 71000 farmer involve in crop insurance