निधीचा घोळ; युवा महोत्सवासाठी प्रतिविद्यार्थी 72 रुपयांची आकारणी 

निधीचा घोळ; युवा महोत्सवासाठी प्रतिविद्यार्थी 72 रुपयांची आकारणी 

सोलापूर : युवा महोत्सवासाठी चार वर्षांपासून विद्यार्थ्यांकडून स्वतंत्र निधी गोळा केला जातो. परंतु, यजमानपद स्वीकारणाऱ्या महाविद्यालयास आतापर्यंत फक्‍त सहा लाख रुपयांचा निधी मिळायचा, तो आता 12 लाख रुपये केला आहे. तरीही निधीअभावी महाविद्यालये युवा महोत्सवाचे यजमानपद स्वीकारायला तयार नव्हती. परंतु, विद्यापीठ मात्र वेगळेच उत्तर देत निधीच्या विषयावर पांघरूण टाकत आहे.

युवा महोत्सवादरम्यान महाविद्यालयात काही गैरप्रकार घडल्यास नाहक बदनामी नको आणि त्याचा फायदा अन्य महाविद्यालयाला होईल, या भीतीपोटी यजमानपद स्वीकारायला बहुतांशी महाविद्यालयांनी नकार दिल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. परंतु, विद्यार्थ्यांकडून गोळा केलेला निधी युवा महोत्सवाच्या माध्यमातून त्यांच्यासाठीच खर्च केला जात नसल्याचे मागील काही वर्षांपासून दिसून येते. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून दरवर्षी प्रो-रेटा, अश्‍वमेध शुल्क, युवा महोत्सव, आपत्कालीन निधी, ई-सुविधा, विद्यापीठ विकास निधी, ऑनलाइन पात्रता अर्ज व पात्रता अर्ज यासाठी तब्बल 383 रुपये गोळा केले जातात. 

आकडे बोलतात... 
एकूण विद्यार्थी - 65 ते 69 हजार 
जमा होणारा निधी - 49.68 लाख 
युवा महोत्सवाचा निधी - 12 लाख 
प्रत्यक्षात येणारा खर्च - 18 ते 20 लाख 
शिल्लक निधी - 29.68 लाख 

विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून 120 रुपये घेतले जातात. त्यातील 48 रुपये संबंधित महाविद्यालयाला दिले जातात तर उर्वरित 72 रुपये युवा महोत्सव, अविष्कार, विद्यार्थी प्रशिक्षण, इंद्रधनुष्य, जनजागृती यासह अन्य विविध कामांसाठी वापरला जातो. - डॉ. गणेश मंझा, कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ

विद्यापीठाकडून युवा महोत्सवासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 72 रुपये घेतले जातात. ती सर्व रक्‍कम विद्यापीठाला जमा केली जाते. तरीही युवा महोत्सवाचे यजमानपद स्वीकारणाऱ्या महाविद्यालयाला पुरेसा निधी मिळत नाही. - शंकर नवले, प्राचार्य, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com