जिल्हाधिकाऱ्यांमुळे ७३ बालकांच्या आयुष्यात नवी पहाट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा

www.deliveringchangeforum.com

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी, शाळांमधून तपासणीत जिल्ह्यात ७३ बालकांना हृदयरोग झाल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी करावी लागणार होती. शस्त्रक्रियेविना ही बालके गेली दोन वर्षे दिवस काढत होती. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नेला. केवळ पैशाअभावी ही ‘उमलती फुले कोमेजू नयेत’ यासाठी त्यांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याने शस्त्रक्रिया मार्गी लागल्या.

शासनाने गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राबवण्यास सुरवात केली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांमधून लहान मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येते आणि त्यांच्यावर उपचार केले जातात. सन २०१३ मध्ये जिल्ह्यात ७३ बालकांना गंभीर हृदयरोगाचा आजार असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी करण्याचा सल्ला देण्यात आला होता; मात्र घरची परिस्थिती गरिबीची आणि शासनाकडून मिळणारे तुटपुंजे अनुदान यामुळे दोन वर्ष ही बालके उपचारापासून वंचित होती. त्यांच्या पालकांसमोर आपल्या पोटच्या गोळ्याचे पुढे काय? हा प्रश्‍न आ वासून उभा होता. 

एका कार्यक्रमात जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या समोर एका बालकाच्या आईने ही समस्या मांडली. त्यांनी याबाबतची माहिती मागवली तेव्हा जिल्ह्यात अशी ७३ मुले असल्याचे समोर आले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आले असता जिल्हाधिकारी गायकवाड यांनी त्यांच्यासमोर ही व्यथा मांडली तसेच त्यांना या बालकांची फाईल सोपवली. त्यांनी याबाबत निश्‍चित मदत करण्याचे आश्‍वासन दिले.
मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री निधीबरोबरच मुंबईतील नामांकित रुग्णालयांना याबाबत सहकार्याचे आवाहन केले. त्यानंतर नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाने तयारी दर्शवली आणि जिल्ह्यातील ७३ बालकांच्या ओपन हार्ट शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. यामध्ये या मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे या बालकांच्या आयुष्यात नवी पहाट उगवली. शासन आणि प्रशासनाने ठरवले तर समाजाला किती चांगला फायदा करून देऊ शकतात हे या ७३ बालकांच्या ओपन हार्ट सर्जरीवेळी झालेल्या समन्वयाने दिसून आले.

Web Title: 73 children's lives collector