विट्यातील महिलांची ७४ लाखांची फसवणूक

विट्यातील महिलांची ७४ लाखांची फसवणूक

विटा - महिला बचत गटाच्या नावावर महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून रोजगार देण्याचे आमिष दाखवून विट्यासह परिसरातील १४७ महिलांसह अन्य महिलांची राहू पिंपळगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथील शिवाजी तुकाराम ढमढेरे व त्याची पत्नी मंदाराणी यांनी ७४ लाख २२ हजार ४०० रुपयांची फसवणूक केली आहे, अशी फिर्याद सविता हरिश पवार (वय ३७, रा. विवेकानंदनगर, विटा) यांनी येथील पोलिसांत दिली.  

फसवणूक मार्च २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत झाली. ढमढरे दांपत्याने सक्‍सेस ग्रुप, पुणे संचलित श्री महालक्ष्मी नारायण महिला महासंघांतर्गत येथील महिलांचा बचत गट स्थापन केला. महिलांना त्यांनी सरकारकडून पंतप्रधान कौशल्य विकास योजनेचे प्रशिक्षण देऊन महिलांना रोजगार देण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे सविता पवार व महिला गटाच्या अध्यक्षांनी महिलांना रोजगार मिळेल, या उद्देशाने विटा व परिसरात मोठ्या प्रमाणात बचत गट स्थापन केले.

प्रत्येक सभासदाकडून २०० रुपये बचत म्हणून घेतली. येथे महालक्ष्मी नारायण महिला महासंघाचे कार्यालय सुरू केले होते. कार्यालयात सभासदांना शिलाई मशिन आणि पार्लरचे प्रशिक्षण दिले जात होते. पुढे डिसेंबर २०१७ मध्ये डिजिटल इंडियाच्या माध्यमातून स्वॅप मशिन खरेदीसाठी सात सभासदांकडून प्रत्येकी ६० हजार रुपये जमा केले होते. त्यानंतर वारंवार मागणी करूनही स्वॅप मशिन मिळाल्या नाहीत.

जानेवारी २०१८ मध्ये येथील कार्यालयात शिवजित मुद्रा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून सभासदांकडून शेअर, बचत खाती, पिग्मी, बचत गट, ठेवी असे सुमारे २९ लाख दोन हजार ४०० रुपये जमा केले. 

याशिवाय, विविध योजना आणि कुपन योजनेसाठी म्हणून जवळजवळ चार लाख ६० हजारांची रक्कम जमा केली होती. मात्र, ढमढेरे यांनी कोणतेही बक्षीस दिले नाही.

गुन्हा दाखल केल्याची पोलिसांची माहिती
सभासदांनी वारंवार मागणी करूनही शिवाजी ढमढेरे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. विट्यातील संबंधित लोक पुण्यात भेटण्यासाठी गेल्यानंतरही ढमढेरे यांनी लवकरच पैसे देतो, असे सांगत टाळाटाळ केल्याने फसवणूक झाल्याचे महिलांच्या लक्षात आले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी ढमढेरे दांपत्यावर गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक अमर काटे तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com