‘स्वाभिमानी’च्या उपसरपंचांकडून ७४ लाख जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

एक नजर

संभाजीपूर (ता. शिरोळ) येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विद्यमान उपसरपंच गौसमहंमद ऊर्फ बरकत अन्वर गवंडी (वय ४७) यांच्या घर आणि दुकानावर निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी रात्री केलेल्या कारवाईत ७४ लाख ६५ हजार २०० रुपये रोकड व लाखो रुपयांचा गुटख्याचा कच्चा व पक्का माल जप्त केला. या प्रकरणी बरकत गवंडी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही रक्कम निवडणुकीसाठी वापरात येणार होती, असा पोलिसांचा अंदाज आहे.

जयसिंगपूर - संभाजीपूर (ता. शिरोळ) येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विद्यमान उपसरपंच गौसमहंमद ऊर्फ बरकत अन्वर गवंडी (वय ४७) यांच्या घर आणि दुकानावर निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी रात्री केलेल्या कारवाईत ७४ लाख ६५ हजार २०० रुपये रोकड व लाखो रुपयांचा गुटख्याचा कच्चा व पक्का माल जप्त केला. या प्रकरणी बरकत गवंडी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही रक्कम निवडणुकीसाठी वापरात येणार होती, असा पोलिसांचा अंदाज आहे.

निवडणुकीच्या आर्थिक निरीक्षण पथकाला संभाजीपूर (ता. शिरोळ) येथे बरकत गवंडी याच्या गोदामात गुटखा असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार सहायक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे, तहसीलदार गजानन गुरव यांनी अन्न भेसळ अधिकाऱ्यांसमवेत छापा टाकला. गवंडी यांचे दुकान जयसिंगपूर येथील १२ व्या गल्लीत आहे. याच पथकाने दुकानाची झडती घेतली.  या वेळी तीन बॅगा घेऊन महिला पळून जाताना आढळली.

बॅगेमध्ये ७४ लाख ६५ हजार २०० रुपये रोकड पोलिसांना मिळाली. शिरोळ तालुक्‍यात सहा पथके तैनात आहेत. पथकासह जयसिंगपूर पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान कारवाईत जीएसटी पथक, अन्न भेसळ यांच्यासह पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत लाखो रुपयांच्या गुटख्याची मोजदाद सुरु होती.

जयसिंगपूरचे सहायक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांना खबऱ्यामार्फत गुटखा व गुटख्याचा कच्चा माल संभाजीपूर येथील कचरे सोसायटीत ठेवल्याची माहिती मिळाली. श्री. शिंदे यांनी खातरजमा केली. त्यांनी तहसीलदार तथा उप निवडणूक अधिकारी गजानन गुरव, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव आदींना कारवाईची कल्पना दिली.

कारवाई सुरू होण्याआधीच अधिकारीदेखील घटनास्थळी दाखल झाले. रात्री १० च्या सुमारास अन्न प्रशासन तसेच जीएसटी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होऊन पंचनामा केला. दरम्यान, जप्त केलेली रोकड नेमक्‍या कशासाठी खर्च करण्यात येणार होती, याचा तपशील उद्या मिळण्याची 
शक्‍यता आहे. संभाजीपूरमधील या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

तीन ठिकाणी कारवाई
पथकाने गवंडीच्या घरासह गोडावून व अन्य दुकानावर अशा तीन ठिकाणी कारवाई केली. दोन ठिकाणी गुटखा व गुटख्याचा कच्चा माल जप्त केला. तर दुकानात रोकड पोलीसांच्या हाती लागले.

महिला घाबरली, रोकड सापडली
संभाजीपूर येथे कारवाई झाल्यानंतर गवंडी यांचे दुकान जयसिंगपूर येथील बाराव्या असलेल्या दुकानावर छापा टाकला असता, या ठिकाणी तीन बॅगा घेऊन महिला पळून जात होती. मात्र पोलिस पथक आलेले पाहून महिलेने बॅगा टाकून पलायन केले. याच बॅगेमध्ये ही रोड मिळाली.

Web Title: 74 lakh seized from sub-panchayes of Swabhimani