नकोशी नाव असणाऱ्या ७५० मुलींचे नामकरण

नंदिनी नरेवाडी
शुक्रवार, 15 मार्च 2019

पहिल्या मुलीनंतर दुसरीही मुलगीच झाली तर 
तिचे नाव नकोशी ठेवण्याचे प्रमाण दुर्गम भागात अधिक आहे. नकोशी मुलीनंतर मुलगाच होतो, अशी समजूत पालकांची आहे, हे लक्षात आल्याने पालकांचे समुपदेशन करून नकोशी मुलींचे नाव बदलण्याचा निर्णय आम्ही घेतला. गेल्या दहा वर्षांत 
यामुळे साडेसातशे मुलींचे नामकरण केले आहे.
- वैशाली महाडिक, अध्यक्षा, आनंदीबाई बहुउद्देशीय महिला संस्था.

कोल्हापूर - शाहूवाडी, पन्हाळा आणि करवीर तालुक्‍यातील दुर्गम भागातील नकोशी नाव असणाऱ्या ७५० मुलींचे नामकरण करीत येथील आनंदीबाई महिला बहुउद्देशीय संस्थेने या मुलींच्या जगण्याला नवा अर्थ दिला आहे. शाहूवाडी तालुक्‍यात याचे प्रमाण अधिक जाणवते. २००८ ते २०१८ या दहा वर्षांत नकोशी नाव असणाऱ्या मुलींच्या पालकांचे प्रबोधन करीत मुलींच्या आवडीची नावे दिली आहेत. संस्थेने फक्त नामकरण करून न थांबता शासन पातळीवर ॲफिडेिव्हट करून शासनाच्या दप्तरी त्याची नोंदही केली आहे.

स्त्रियांविषयी सन्मान वाढावा आणि कुटुंबात, समाजात असलेले गैरसमज दूर होण्यासाठी दहा वर्षांत विविध पातळ्यांवर जागृती सुरू आहे. अनेक कुटुंबांत मुलगी झाली म्हणून तिचे नाव नकुशी ठेवले आणि मुलगी म्हणून कळत-नकळत पाळण्यातच तिच्या वाट्याला हेटाळणी आणि उपेक्षा आली. समाज नाक मुरडू लागला. अशा नकोशींचे नाव बदलण्याचा उपक्रम असंख्य संस्थांनी राबवला. ही बाब आता जुनी झाली; पण नकुशी नाव जसे लौकिक अर्थाने बदललं, त्यापुढे पाऊल टाकत गॅझेटमध्येही बदललेले नाव नोंद करण्याचे पाऊल या संस्थेने टाकले आहे. परिणामी, नकोशी नाव पुसलेल्या व नवे नाव धारण केलेल्या युवतींचा केवळ समाजातच नव्हे, तर सरकार दप्तरीही सन्मान वाढत आहे.

बचत गटांच्या माध्यमातून काम करताना संस्थेला शाहूवाडी तालुक्‍यातील महिलांमध्ये नकोशी नाव असणाऱ्या मुलींचे प्रमाण जास्त असल्याचे जाणवले. नकोशी नावामुळे या मुलींमध्ये आपण आपल्या पालकांनाच नको आहोत, ही भावना वाढीस लागते. त्यातून त्या नैराश्‍यातही जाऊ शकतात. यामुळे संस्थेने दुर्गम भागातील वाड्यावस्त्यांवर जाऊन नकोशी नावाच्या मुलींना शोधले. त्यांच्या पालकांचे प्रबोधन करून त्यांच्या आवडीचे नाव त्यांना ठेवले.

ग्रामस्थांत जागृती
संस्थेला कार्य करताना लक्षात आले, की मुलीचे नाव नकोशी ठेवल्यानंतर मुलगा होतो, ही अंधश्रद्धा येथील लोकांमध्ये आहे. ती अंधश्रद्धा आहे, हे पालकांना पटवून देण्याचे मोठे आव्हान संस्थेसमोर होते. संस्थेने विविध उपक्रम राबवत या भागात जनजागृती केली.

पहिल्या मुलीनंतर दुसरीही मुलगीच झाली तर 
तिचे नाव नकोशी ठेवण्याचे प्रमाण दुर्गम भागात अधिक आहे. नकोशी मुलीनंतर मुलगाच होतो, अशी समजूत पालकांची आहे, हे लक्षात आल्याने पालकांचे समुपदेशन करून नकोशी मुलींचे नाव बदलण्याचा निर्णय आम्ही घेतला. गेल्या दहा वर्षांत 
यामुळे साडेसातशे मुलींचे नामकरण केले आहे.
- वैशाली महाडिक,
अध्यक्षा, आनंदीबाई बहुउद्देशीय महिला संस्था.

Web Title: 750 girls Nakoshi name changed in Kolhapur District