जिल्ह्यातील 76 शेतकऱ्यांना विमासंरक्षण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

काशीळ - गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत मार्चअखेर जिल्ह्यातील ७६ शेतकऱ्यांना विमा संरक्षणाचा लाभ मिळाला. गेल्या नऊ वर्षांत जिल्ह्यातील एक हजार १८३ शेतकऱ्यांना या योजनेतून विमा संरक्षणाचा लाभ मिळाला आहे.

काशीळ - गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत मार्चअखेर जिल्ह्यातील ७६ शेतकऱ्यांना विमा संरक्षणाचा लाभ मिळाला. गेल्या नऊ वर्षांत जिल्ह्यातील एक हजार १८३ शेतकऱ्यांना या योजनेतून विमा संरक्षणाचा लाभ मिळाला आहे.

शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास, अपघातात दोन्ही डोळे, दोन्ही हात निकामी किंवा दोन्ही पाय निकामी झाल्यास एक लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. नोव्हेंबर २०१५ मध्ये शेतकरी अपघात विमा योजनेला ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ असे नाव देण्यात आले. या योजनेत डिसेंबर २०१५ पासून प्राप्त झालेल्या प्रस्तावांना दुप्पट म्हणजे दोन लाख रुपयांचे विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. शेतात दैनंदिन कामे करताना शेतकऱ्यांना विविध प्रकारचे अपघात होतात. अनेकदा विषारी प्राण्यांचा दंश, वीज पडणे, विजेचा धक्‍का लागणे, रस्ते अपघात या घटनांमध्ये शेतकऱ्यांचे मृत्यू होतात.

अपघातात घरातील कर्ती व्यक्‍ती गमावलेल्या शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी शेतकरी जनता अपघात विमा योजनेतून संरक्षण देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत मार्चअखेर जिल्ह्यात १६४ प्रस्ताव विमा कंपनीस सादर करण्यात आले होते. त्यापैकी ७६ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, तीन प्रस्ताव नामंजूर, तर ८५ प्रस्ताव प्रलंबित आहेत. शेतकरी अपघात विमा योजना सुरू असली तरी या योजनेबद्दलची माहिती नसल्यामुळे शेतकरी वर्ग या मदतीपासून वंचित राहण्याची शक्‍यता असते. त्यामुळे कृषी विभागाकडून या योजनेतून जास्तीत जास्त मदत व्हावी, यासाठी दुर्घटनाग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन प्रस्ताव जमा केले जात आहेत.

...ही आहे सद्य:स्थिती
विमा कंपनीस प्रस्ताव सादर - 164
मंजूर प्रस्ताव - 76
नामंजूर प्रस्ताव - 03
प्रलंबित प्रस्ताव - 25

Web Title: 76 farmer insurance security