एकही कारखाना सुरू नाही, तरही दररोज 8 हजार मेट्रिक टन उसाची तोडणी

अण्णा काळे
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

■ करमाळा तालुक्‍यातील उजनी पट्ट्यातील परिस्थिती 
■ बाहेरील कारखान्यांना जातोय मोठ्याप्रमाणावर ऊस 
■ आदिनाथ, मकाई कारखाना सुरू होण्याची शक्‍यता कमी 
■ कमलाभवानी शुगर, भैरवनाथ शुगरने केली गाळपाची तयारी

करमाळा (जि. सोलापूर) : राज्यात अनेक साखर कारखाने सुरू झाले आहेत. मात्र, करमाळा तालुक्‍यातील चारपैकी एकही साखर कारखाना अद्याप सुरू झाला नाही. एकही साखर कारखाना सुरू झालेला नसताना तालुक्‍यात दररोज साधारणपणे आठ हजार मेट्रिक टन ऊसाची तोड होत आहे. हा सर्व ऊस तालुक्‍याबाहेरील कारखाने घेऊन जात आहेत. 
करमाळा तालुक्‍यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना व श्री मकाई सहकारी साखर कारखाना यंदा सुरू होण्याची शक्‍यता कमी आहे. हे दोन्ही कारखाने सहकारी असून ते बागल गटाच्या ताब्यात आहेत. तर माढ्याच्या शिंदे बंधूचा कमलाभवानी शुगर व सावंत यांचा श्री भैरवनाथ शुगर हे खाजगी साखर कारखाने आहेत. हे दोन्ही खाजगी कारखान्यांनी यंदाच्या गाळपाची तयारी सुरू आहे. 

हेही वाचा : उसाला देणार ते अडीच हजारांचा भाव 

तालुक्‍याबाहेरील अंबालिका शुगर (राशिन), बारामती ऑग्रो, विठ्ठलराव शिंदे (पिंपळनेर), माळीनगर शुगर या कारखान्याच्या टोळ्यांनी ऊस तोडणी सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी गेल्यावर्षी दुष्काळी परिस्थिती असतानाही मोठ्या कष्टाने ऊस जगवला आहे. त्यामुळे जो कारखाना जास्त भाव देईन त्याच कारखान्याला ऊस घालण्याच्या मानसिकतेत शेतकरी आहेत. गत वर्षी करमाळा तालुक्‍यातील एकाही कारखान्याने 2200 पेक्षा जास्त भाव दिला नाही. तर बाहेरील कारखान्यांनी 2600 पेक्षा जास्त भाव दिला आहे. त्यामुळे यावर्षी तालुक्‍यातील सुरू होणाऱ्या साखर कारखान्यांना स्पर्धक साखर कारखान्याच्या बरोबरीने भाव द्यावा लागणार आहे. जर ते स्पर्धक साखर कारखान्याच्या बरोबरीने भाव देऊ शकले नाही तर या कारखान्यांना गाळप करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. 

हेही वाचा : शिवसेनेच्या पोस्टरवर झळकले राष्ट्रवादीचे आमदार 

करमाळा तालुक्‍यातील साधारणपणे 815 टोळ्या बाहेरील कारखान्यांसाठी ऊस तोडत आहेत. त्यातील सर्वाधिक टोळ्या अंबालिका शुगरच्या आहेत. 
उजनी धरणाच्या ऊस पट्यातील वाशिंबे गटात सर्वाधिक वाहाने सध्या ऊस वाहतूक करत आहेत. कंदर, वांगी, चिखलठाण, उमरड, पारेवाडी, जिंती, कोंढारचिंचोली या भागातही ऊस तोडणी सुरू आहे. बाहेरील कारखान्याच्या बरोबरीने तालुक्‍यातील कारखान्यानेही भाव द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

हेही वाचा : मुख्यमंत्री महोदय कर्जमाफीचे तेवढे बघाच

जास्त दर देणारांना देणार ऊस 
आता शेतकरी जागरूक झाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा उसाचे क्षेत्र पन्नास टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. दुष्काळात ऊस जगवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. त्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागले आहेत. त्यामुळे जो कारखाना जास्त बाजार देईन त्याच कारखान्याला शेतकरी ऊस घालणार आहेत. 
- नवनाथ झोळ, ऊस उत्पादक, वाशिंबे, ता. करमाळा 

410 वाहनांनी ऊस वाहतूक 
गेल्यावर्षी अंबालिका शुगरने साधारणपणे 4 लाख 50 हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले आहे. या वर्षी करमाळा तालुक्‍यातील 6 लाख मेट्रीक टनापेक्षा जास्त ऊसाचे गाळ आम्ही करणार आहेत. त्यासाठी दररोज 410 वाहानांनी ऊस वाहातूक सुरू आहे. यावर्षी अंबालिका शुगर चांगला दर देणार आहे. 
- दत्तात्रय पागिरे, ऑग्री सुपरवायझर, अंबालिका शुगर, राशिन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 8,000 metric tonnes of sugarcane is harvested every day