नगर : मेडिक्‍लेमच्या आमिषाने 81 लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

संगमनेर (नगर) : मेडिक्‍लेम सुविधेपोटी भरलेल्या रकमेचा, नऊ वर्षांनंतर मॅच्युरिटी झाल्यावर दामदुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने 296 जणांची 81 लाख 29 हजार 387 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई येथील फिनॉमिनल हेल्थ केअर सर्व्हिसेस या कंपनीत ही गुंतवणूक करण्यात आली होती.

आरोपींची नावे अशी : कंपनीचा अध्यक्ष नंदलाल केशरसिंग, कार्यकारी संचालक जोसेफ लाझार (दोघे रा. मालाड पश्‍चिम, मुंबई), विभागीय विपणन व्यवस्थापक नितीन रावसाहेब हासे (रा. चिखली, ता. संगमनेर), विभागीय व्यवस्थापक बापू प्रभाकर माने (रा. नारायणगाव, ता. जुन्नर), विक्री व्यवस्थापक राजेंद्र सूर्यभान उपाध्ये (रा. चिखली, ता. संगमनेर), नितीन बाळासाहेब पोखरकर (ता. जुन्नर) व रामनाथ रंगनाथ गोडगे (रा. चिखली).

याबाबत सुभाष कचरू भुजबळ (वय 65, रा. नाशिक) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, 28 फेब्रुवारी 2009 ते जून 2016 या कालावधीत फिनॉमिनल हेल्थ केअर सर्व्हिसेस (मुंबई) कंपनीच्या येथील नवीन नगर रस्त्यावरील कार्यालयात, तसेच येवला येथील वाघ हाऊस कार्यालयात गुंतवणूक केली होती.

गुंतवलेली रक्कम नऊ वर्षांनी दुप्पट मिळेल, तसेच मेडिक्‍लेमही राहील, असे त्या वेळी सांगण्यात आले. त्यानुसार, तब्बल 296 जणांनी 81 लाख 29 हजार 387 रुपयांची गुंतवणूक केली. त्याच्या पावत्याही फिर्यादींकडे आहेत; मात्र मुदत संपताच परताव्याचे पैसे न देता किंवा सुविधा न पुरविता, येथील कार्यालय बंद करण्यात आले. त्यामुळे सर्वांची आर्थिक फसवणूक झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 81 lakh cheated through Mediclaim