होळी साजरी करून परतताना नऊ तरुणांवर काळाची झडप

चिक्क सिंदगी - अपघातातील क्रूझरचा असा चक्काचूर झाला.
चिक्क सिंदगी - अपघातातील क्रूझरचा असा चक्काचूर झाला.

मांजरी - विजापूर-सिंदगी राज्य महामार्गावर कंटेनर व क्रूझर यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात नऊ तरुण जागीच ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले. शुक्रवारी (ता. 22) पहाटे विजापूर जिल्ह्यातील चिक्क सिंदगी गावाजवळ ही घटना घडली. सर्व मृत व जखमी गुलबर्गा जिल्ह्यातील चित्तापूरचे आहेत. होळी व धूलिवंदनाच्या सुटीसाठी गोव्याला गेलेल्या या तरुणांवर गावी परतताना काळाने झडप घातली. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

श्रीनाथ ईश्‍वराप्पा नालवार (वय 25), अंबरीश लक्ष्मण डोरे (वय 30), युनूस सर्वरपटेल कडबुर (वय 25), मुनाफ सर्वरपटेल कडबुर (28), शाकीर अब्दुलरहेमान शेख (वय 27), आजिम अब्दुलरहेमान शेख (वय 35), सागर शंकरेप्पा दोडमनी (वय 22), चॉंद मुश्‍कसाब मुजावर (वय 24), गुरूराज साबण्ण हकीम (वय 35) अशी मृतांची नावे आहेत. यातील युनूस व मुनाफ कडबुर तसेच शाकीर व आजिम शेख हे सख्खे भाऊ होते. मंजूर सर्वरसाब कडबुर (वय 32), आकाश लक्ष्मण दोरे (वय 20), मल्लिकार्जुन बसवराज जमादार (वय 29) व सद्दाम (वय 25) हे जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी - हे सर्व तरुण गोव्यावरून परत आपल्या गावी येत असताना विजापूर-सिंदगी महामार्गावर विजापूरकडे येणारी क्रूझर (केए 24 एन 6307) व विजापूरहून आंध्र प्रदेशकडे जाणारा कंटेनर (एपी 37 टीई 9199) यांच्यात हा अपघात घडला. क्रूझरचालक ओव्हरटेक करत असताना चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरला जोराची धडक दिली. आनंद नागेश्‍वरराव सुपेठी (वय 25, रा. ताडपल्लीगुंड) हे कंटेनर चालवित होते. घटनास्थळी विजापूर जिल्हा पोलिसप्रमुख प्रकाश निकम, सिंदगी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक वीराण्णा लट्टी आपल्या सहकाऱ्यांबरोबर दुपारी दोन वाजेपर्यंत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परिश्रम घेत होते.

वाहनांच्या रांगा, गर्दीवर लाठीमार
पहाटेच्या वेळी झालेल्या या अपघातामुळे राज्य महामार्ग क्रमांक 218 वरील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक ठप्प झाल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. गर्दीला हटवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com