‘महावितरण’द्वारे ९०३३ कामे पूर्ण

Mahavitaran
Mahavitaran

सातारा - थेट गावात जाऊन वीज यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणी या त्रिसूत्री मोहिमेतील ‘एक गाव-एक दिवस’ या ‘महावितरण’च्या उपक्रमातून जिल्ह्यात ६० गावांमध्ये नऊ हजार ३३ विविध कामे करण्यात आली आहेत. 

‘एक गाव- एक दिवस’ या उपक्रमातून बारामती परिमंडल कार्यक्षेत्रातील सातारा, सोलापूर जिल्ह्यांसह पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्‍यांत १४२ गावांत एकूण १२ हजार २७८ कामे केली आहेत. त्यामध्ये वीज यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचे नऊ हजार ९१९ कामे, वीजबिल व वीजमीटर संदर्भातील दोन हजार १७७ तक्रारींचे निवारण व १८२ नवीन वीजजोडण्यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत साताऱ्यातील पाच, कऱ्हाडमधील दहा, फलटणमधील १२, वडूजमधील १८ व वाई विभागामधील १५ गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या ६० गावांमध्ये वीज यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचे एकूण सात हजार ६२७ कामे करण्यात आली. यामध्ये रोहित्रातील तेलाची पातळी वाढविणे, तारांमधील झोल काढणे, वीज खांबाला रंगकाम, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडणे, पीन व डिस्क इन्सुलेटर बदलणे, वितरण रोहित्रांना अर्थिंग करणे, डिस्ट्रीब्युशन बॉक्‍सचे क्‍लिनिंग व आवश्‍यक दुरुस्ती, किटकॅट बदलणे, सडलेले वीजखांब बदलणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, नादुरुस्त व धोकादायक सर्व्हिस वायर्स बदलणे आदी कामांचा समावेश आहे. याशिवाय सदोष व नादुरुस्त वीजमीटर बदलणे, वीजबिलांची दुरुस्ती, वीजमीटरची तपासणी, नावात बदल, सदोष व नादुरुस्त मीटर बदलून देणे, वीजदेयके मिळत नसल्यास ती उपलब्ध करून देणे, मीटर घराबाहेर काढणे अशा प्रकारची एक हजार ३१९ कामे करण्यात आली तर आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ८७ ग्राहकांना जागेवरच नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.

मुख्य अभियंता सुनील पावडे, अधीक्षक अभियंता पूनम रोकडे, कार्यकारी अभियंता उदय कुलकर्णी (प्रशासन), सतीश राजदीप (फलटण), सुनीलकुमार माने (सातारा), संजय सोनवलकर (वाई), अभिमन्यू राख (कऱ्हाड), अरविंद यादव (वडूज) तसेच उपकार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्यासह शेकडो जनमित्र या उपक्रमात सहभागी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com