93 वर्षांच्या "तरुणा'पुढे चोर "फेल' 

संजय आ. काटे
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

शहराजवळील मांडवगण रस्त्यावरील शाडूचा मळा येथे मंगळवारी (ता. 26) मध्यरात्री हा थरार झाला. धोंडिबा यशवंत तरटे (वय 93) असे या "तरुणा'चे नाव. दरम्यान, याबाबत बबन रोडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. 

श्रीगोंदे : वय वर्षे "अवघे' 93.. मात्र, या "तरुणा'ने तीन चोरांच्या नाकीनव आणले. त्यांचा प्रतिकार चिवट होता. तिखट होता. त्यांनी धाडस तर केले; पण वय आडवे आले. अखेरचा उपाय म्हणून चोरांनी निर्दयपणे त्यांच्यावर कुऱ्हाडीचे वार केले नि त्या "तरुणा'ची पकड ढिली झाली.. कुऱ्हाडीच्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले; पण चोरांनाही काही मिळाले नाही. रिकाम्या हातानेच त्यांना परतावे लागले. 

शाडूचा मळ्यातील थरार 
शहराजवळील मांडवगण रस्त्यावरील शाडूचा मळा येथे मंगळवारी (ता. 26) मध्यरात्री हा थरार झाला. धोंडिबा यशवंत तरटे (वय 93) असे या "तरुणा'चे नाव. दरम्यान, याबाबत बबन रोडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. 

पैसे कुठे ठेवले ते सांग 
अधिक माहिती अशी : शहराजवळील मांडवगण रस्त्यावरील बंगल्यात धोंडिबा तरटे एकटेच राहतात. मंगळवारी (ता. 26) मध्यरात्री तीन चोरांनी तरटे यांच्या बंगल्यात प्रवेश केला. घरात सामानाची उचकापाचक केली; परंतु तेथे काहीच मिळाले नाही. नंतर चोरांनी धोंडिबा तरटे झोपलेल्या खोलीकडे आपला मोर्चा वळविला. चोरांच्या आवाजाने धोंडिबा जागे झाले. "कोण आहे' अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर चोरांनी, "पैसे कुठे ठेवले ते सांग' असे म्हटले. 

ते गंभीर जखमी झाले 
वयस्कर धोंडिबा क्षणात सज्ज झाले. त्यांनी चोरांचा प्रतिकार करण्यास सुरवात केली. तीन चोर नि एका वृद्धात झटापट सुरू झाली. माघार घेण्यास वृद्ध धोंडिबा तयार नव्हते, तर रिकाम्या हाताने परतण्यास चोरही राजी नव्हते. घरात काहीच न मिळाल्यामुळे, तसेच धोंडिबा तरटे यांच्या कडव्या प्रतिकारामुळे चिडलेल्या चोरांनी मागचा-पुढचा विचार न करता, हातातील कुऱ्हाडीने धोंडिबा यांच्या डोक्‍यावर कुऱ्हाडीचा घाव घातला. हा घाव वर्मी होता. त्यात धोंडिबा तरटे गंभीर जखमी झाले. 

ते रिकाम्या हाताने परतले 
अखेर चोरांना रिकाम्या हातानेच परतावे लागले. जखमी अवस्थेत धोंडिबा पडून होते. काही जणांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, घटनास्थळी श्वानपथकाने येऊन चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पोलिस उपअधीक्षक संजय सातव व पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली. 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 93-years man fijhts three thieves