जामखेड : प्रधानमंत्री आवास योजनेतून 933 घरांच्या प्रस्तावास मंजुरी 

वसंत सानप
शुक्रवार, 22 जून 2018

प्रधानमंत्री आवास योजना अधिक गतिमान होण्यासाठी नागरिक व लोकप्रतिनिधींनी सहकार्य करण्याची गरज आहे. त्यामुळे उर्वरित प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर होतील. 
- विठ्ठल काकडे, नोडल ऑफिसर, नवनिर्माण बहुउद्देशीय संस्था, अकोले 

जामखेड : प्रधानमंत्री आवास योजनेतून घटक क्रमांक चारमधील 933 घरांसाठी 63 कोटींच्या प्रस्तावास मुंबई येथे झालेल्या राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. हा प्रस्ताव मंजुरीसाठी लवकरच केंद्राकडे पाठविला जाणार आहे. 

जामखेडमध्ये दोन महिन्यांपासून प्रधानमंत्री आवास योजनेची प्रक्रिया सुरू आहे. त्यात जनजागृती करणे, अर्ज मागविणे, कागदोपत्री, तसेच स्थळपाहणी, लाभार्थी ठरविण्याची कामे नवनिर्माण बहुउद्देशीय संस्था, अकोले व पालिकेतर्फे करण्यात आली. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी सात जून रोजी 933 घरांसाठी 63 कोटींचा प्रकल्प अहवाल पाठविला होता. त्याला बैठकीत मंजुरी मिळाली. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला जाणार आहे. 

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी शहरातून 3425 अर्ज आले. त्यांतील लाभार्थींचा पहिला प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. उर्वरित प्रस्ताव टप्प्याटप्प्याने पाठविले जाणार आहेत. त्यांना मंजुरी मिळविण्यासाठी मुख्याधिकारी औंधकर, नगराध्यक्ष अर्चना सोमनाथ राळेभात, तसेच नगरसेवक पाठपुरावा करीत आहेत. गृहनिर्माण विभागाच्या बैठकीत राज्यभरातून प्रस्ताव आले होते. त्यांत नगर जिल्ह्यातून जामखेडचे 933 व अकोल्याचे 322 प्रस्ताव मंजूर झाले. 

प्रधानमंत्री आवास योजना अधिक गतिमान होण्यासाठी नागरिक व लोकप्रतिनिधींनी सहकार्य करण्याची गरज आहे. त्यामुळे उर्वरित प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर होतील. 
- विठ्ठल काकडे, नोडल ऑफिसर, नवनिर्माण बहुउद्देशीय संस्था, अकोले 

राज्य सरकारची मंजुरी मिळालेल्या 933 घरांच्या बांधकामांबाबत, तसेच अनुदानाच्या टप्प्यांसंदर्भात आणि योजनेच्या पुढील मार्गदर्शनासाठी लवकरच बैठक बोलाविली जाणार आहे. 
- अर्चना राळेभात, नगराध्यक्ष 

Web Title: 933 homes under pradhan mantri awas yojna in jamkhed

टॅग्स