Accident News: ...अन् भरधाव कार थेट रसवंतीगृहात घुसली, भीषण अपघातात शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident News

Accident News: ...अन् भरधाव कार थेट रसवंतीगृहात घुसली, भीषण अपघातात शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील खंडोबाची वाडी येथे भरधाव वेगाने जाणारी कार थेट रसवंतीगृहाच्या शेडमध्ये घुसल्यामुळे एका शाळकरी विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. समर्थ संतोष शिंदे (वय 11) असे मृत मुलाचे नाव आहे. हा अपघात काल (रविवारी) घडला.

भिलवडी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून या घटनेनंतर चालक फरार झाला आहे. समर्थच्या दुर्दैवी मृत्यूनंतर कुटुंबातील लोकांनी व आई वडील यांनी मोठा आक्रोश केला. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

तासगांव भिलवडी रोडवर खंडोबाची वाडी येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ असणाऱ्या शेताच्याजवळ संतोष गोपाळ शिंदे यांचे रसवंतीगृह आहे. या रसवंतीगृहात चालक शिंदे यांचा मुलगा समर्थ बसला होता. भिलवडी स्टेशनकडून भरधाव वेगाने जाणारी सियाज कार (एमएच-10-सीएक्स-4081) रसवंती गृहाच्या थेट शेडमध्ये घुसली.

हा अपघात इतका भयंकर होता की रस्त्याच्या डाव्या बाजूने चाललेली गाडी रस्त्याच्या उजव्या बाजूला असणाऱ्या रसवंतीगृहात भरधाव वेगाने घुसली. गाडीमुळे रसवंती गृहाचे पत्र्याचे शेड शेतात कोसळले. रसवंतीगृहाजवळ बसलेल्या समर्थलाही गाडीने फरफटत पुढे नेले.

गाडीच्या पुढील चाकाखाली आल्यामूळ समर्थचा जागीच मृत्यू झाला. समर्थ खंडोबाचीवाडी विद्यालयात इयत्ता पाचवीमध्ये शिकत होता. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थ जमा होत असल्याचे पाहून चालक वाहन सोडून पसार झाला. सदर घटना नायरा पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत भिलवडी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांकडून चालकाचा शोध घेणे सुरू आहे.