भाविकांसाठी 'आम्ही वर्णेकर' जलदूत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

कोणत्याही कार्याची सुरवात ही आपल्यापासूनच करावी लागते, याची खूणगाठ या ‘आम्ही वर्णेकर’ ग्रुपमधील माझ्या सर्व गावबंधूंनी मनाशी सुरवातीला बांधली. त्याचे मूर्त स्वरूप या उपक्रमाने यात्रेत दिसून आले.
- समाधान सपकाळ, वर्णे

श्री काळभैरवनाथ यात्रेत जागोजागी मोफत शुद्ध, थंड पाण्याची सोय

अंगापूर (सातारा) : वर्णे येथील मागील दोन वर्षांपासून सुरू असणाऱ्या ‘आम्ही वर्णेकर’ या व्हॉट्‌सॲप ग्रुपने नुकत्याच झालेल्या श्री काळभैरवनाथ यात्रेत येणाऱ्या हजारो भाविकांना जागोजागी शुद्ध व थंड पाण्याची सोय मोफत उपलब्ध करून इतर ग्रुपसमोर वेगळा आदर्श घालून दिला आहे.

सध्या सोशल मीडियाने सर्वत्र जनमाणसाच्या मनावर भूरळ घातली आहे. सर्वात जास्त वापर व्हॉट्‌सॲपचा केला जात असून, हाय, हॅलोसह गुड मॉर्निंग, गुड नाईटबरोबर दररोज अनेक ठिकाणी घडणाऱ्या चांगल्या- वाईट घटना सेकंदाच्या आत यावर अपलोड करण्यात जणू दिवसेंदिवस चढाओढ लागली आहे. दररोज नवनवीन ग्रुप जन्माला येत आहेत. त्यामध्ये तरुण मित्रांबरोबरच शहर, गावातील, चौकातील, शाळेतील, कॉलेजातील, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, व्यावसायिक, सरकारी नोकरदार इतकेच नव्हे तर अगदी गल्लीबोळातील ग्रुपनीसुद्धा धुमाकूळ घातला आहे; परंतु दररोज आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबरोबर एखादे विधायक अथवा सामाजिक बांधिलकी जपणारे ग्रुप नगण्यच दिसून येतात. असेच विधायक व समाजाची वाहवा व कौतुक मिळविणारे कार्य वर्णे येथील मागील दोन वर्षांपासून सुरू असणाऱ्या ‘आम्ही वर्णेकर’ या व्हॉट्‌सॲप ग्रुपने करून दाखवित इतरांसमोर एक वेगळा मार्ग व आदर्श घालून दिला आहे.

ग्रुपने नुकत्याच झालेल्या श्री काळभैरवनाथ यात्रेत येणाऱ्या भाविकांना जागोजागी शुद्ध, थंड पाण्याची सोय मोफत उपलब्ध करून दिली. उन्हाच्या काहिलीने व्याकूळ झालेल्या तहानलेल्या यात्रेकरूंना संपूर्ण यात्रा ठिकाणी या ग्रुपचे सदस्य मोठ्या आत्मीयतेने पाणीवाटप अविरत करत होते.

गावातील सुमारे २०० ते २५० सदस्य संख्या असणाऱ्या ग्रुपमध्ये वर्णे व देशातील अनेक ठिकाणी नोकरी, व्यवसाय व इतर कारणाने वास्तव्यास असलेल्या गावकऱ्यांनी या विधायक कार्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवित आपापल्या कुवतीप्रमाणे आर्थिक साहाय्य केले. सामाजिक बांधिलकीचे भान राखत व काहीतरी नवीन व भरकटलेल्या युवक वर्गाला चांगल्या कृतीने मार्गस्थ करण्यासाठी राबविलेला हा उपक्रम येणाऱ्या प्रत्येक भाविकाने नावजत व आपल्या आठवणीत जतन करतच यात्रेचा निरोप घेतला.

Web Title: aamhi warnekar whatsaap group free cold water at yatra satara